शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांगीण सुधारक, देव न मानणारा 'देवमाणूस'...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 07:20 IST

'' आगरकर अधिक जगले असते आणि राजकारणाकडे वळले असते तर ते नेमस्त नव्हे तर जहाल राजकारणी झाले असते...''

ठळक मुद्दे गोपाळ गणेश आगरकर स्मृतिदिन विशेष

- डॉ. राजा दीक्षित, प्राध्यापक (इतिहास), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ—-महाराष्ट्रातील क्रांतिकारक कवी केशवसुत यांनी 'गोफण' या कवितेत 'कठीण शब्द या धोंड्यांनी, करितो हाणाहाण' असे म्हटले आहे. केशवसुत म्हणजे गोपाळ गणेश आगरकर यांचे न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थी. केशवसुत हे केवळ आगरकरांचे विद्यार्थीच नव्हते, तर आगरकरांचा सुधारणावाद केशवसुतांच्या कवितेत उतरलेला दिसतो. हरी नारायण आपटे हेही आगरकरांचे विद्यार्थी. त्यांच्या कथा आणि कादंबऱ्यांमधूनही आगरकरी सुधारणावादाचा प्रत्यय येतो. केशवसुतांनी ज्या कठोरपणाचा उल्लेख केला आहे, तो आगरकरांच्या लेखनामध्ये होता. म्हणूनच त्यांनी आपल्या भाषेचा उल्लेख 'अप्रिय पण पथ्यकारक', असा केला होता. अशी मांडणी करणारी माणसे सहसा लोकप्रिय होत नाहीत. आगरकरांच्या वाट्याला ही त्यामुळे लोकप्रियता आली नाही. त्या काळात त्यांचे मोठ्या प्रमाणात अनुयायी नव्हते आणि आजही नाहीत. गोपाळ गणेश आगरकर यांचा डोळसपणावर इतकाच होता की, अंधभक्त त्यांच्या वाटेला जाणेही शक्य नव्हते. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात कधीच आगरकरोत्सव साजरे झाले नाहीत. पण उत्सव साजरे झाले नाहीत किंवा खूप मोठी लोकप्रियता लाभली नाही, म्हणून आगरकरांच्या मोठेपणाला बाधा येत नाही.

गोपाळ गणेश आगरकर यांचा आज 125 वा स्मृतिदिन केसरी मराठाचे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, संपादक, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, सुधारकर्ते, स्त्री हक्कांचे भक्कम पुरस्कर्ते आणि देव न मानणारा देव माणूस म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर. एकोणीसाव्या शतकातल्या महाराष्ट्रात बुद्धिवादाचा झेंडा रोवणारे, अज्ञेयवादाचे एकांडे शिलेदार म्हणजे आगरकर. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, हाच मुळात त्यांचा बाणा होता. एकोणिसाव्या शतकातल्या महाराष्ट्रात अत्यंत कठोर शब्दात परंपरेची चिकित्सा करणारे महात्मा फुले यांचा अपवाद वगळता आगरकरांसारखा अन्य सुधारक विरळाच.

सुधारणावादाच्या पायावर आणि स्वातंर्त्य, समता, बंधुता यासारख्या तत्त्वांच्या आधारावर नवभारताची उभारणी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांपैकी आगरकर हे महत्त्वाचे विचारवंत मानले जातात. आपल्या सर्वांना आगरकर मुख्यत: समाजसुधारक, त्यातही स्त्री हक्कांचे पुरस्कर्ते म्हणून ज्ञात आहेत. त्यांचा स्त्रीविषयक सुधारणावाद निव्वळ दयेपोटी किंवा भावुकतेने मांडलेला नव्हता. त्यामागे बुद्धिवादाची बैठक आणि समतेची दृष्टी होती. ज्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणे पाप समजले जात होते, त्या काळात मुलींना समान शिक्षण द्यावे, असा विचार त्यांनी मांडला. मुलींना शिक्षण आणि तेही मुलांच्या बरोबरीने द्यावे हे मांडण्याचे कारण म्हणजे सामाजिक संबंधांमधील विषमता त्यांना अमान्य होती. स्त्रीकडे 'प्रजाजनन यंत्र 'म्हणून पाहण्याची वृत्ती त्यांच्या दृष्टीने निषेधार्ह होती. स्त्रीला विवाहविषयक स्वातंत्र्य दिलेच पाहिजे, मात्र विवाहाचा अंमलबजावणीतील म्हणजेच संसारातील स्वातंत्र्यही तिला मिळाले पाहिजे, या अर्थाचे मांडणी त्यांनी केली. यासंदर्भात आगरकरांनी स्वयंवराची कल्पना उचलून धरली. त्यांनी म्हटले, जे स्वयंवर नाही, त्यास आम्ही बालविवाह मानतो. ज्याचे त्याने लग्न करणे म्हणजे स्वयंवर आणि एकाचे लग्न दुर्स­याने करणे म्हणजे बालविवाह. अर्धे स्वयंवर आणि अर्धा बालविवाह अशी पद्धत शक्य नाही, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांची स्त्रीविषयक समतेची कल्पना अत्यंत परिपक्व होती आणि ती आजही अनुकरणीय आहे.

समाजसुधारक आगरकर यांची प्रतिमा शालेय वयापासून आपल्या मनावर ठसलेली असते. ती चुकीची नाही; मात्र हेही लक्षात घ्यावे लागेल की, आगरकर हे 'सर्वांगीण सुधारक' होते. आचार्य शं. द.जावडेकर यांनी म्हटले आहे की, बुद्धिवादाच्या आधारे सर्वांगीण सुधारणा मांडू पाहणारा आगरकरांसारखा पुढारी महाराष्ट्रातच काय पण अन्य प्रांतातही नव्हता. समाजसुधारक असलेले आगरकर कट्टर राष्ट्रवादीसुद्धा होते. आगरकर अधिक जगले असते आणि राजकारणाकडे वळले असते तर ते नेमस्त नव्हे तर जहाल राजकारणी झाले असते', अशा अर्थाचे उद्गार प्रा. ग. प्र. प्रधान यांनी काढले आहेत. आगरकरांच्या लेखनात त्यावेळच्या आर्थिक राष्ट्रवादाचे पडसाद उमटलेले दिसतात. उदाहरणार्थ, ब्रिटिशांनी भारताचे आर्थिक शोषण चालवले होते, त्याचा ऊहापोह आगरकरांनी केला. तसेच स्वदेशीचा तत्त्वाचा पुरस्कारही त्यांनी केला. व्यापार, औद्योगिक प्रगती, शेती सुधारणा याबाबतचे परखड विचारही त्यांनी मांडले. आगरकरांनी मांडलेली 'शेतपेढी'ची कल्पना आजही उल्लेखनीय वाटते. त्यांनी संस्कृतीसंदर्भातही महत्त्वपूर्ण मांडणी केली. भाषा, व्याकरण, साहित्य, संस्कृती, सृष्टी यासंदर्भात त्यांनी लेखन केलेले आढळते. या सर्व लेखनातूनही सुधारणावादाचा प्रत्यय येतो. उदाहरणार्थ, शेक्सपिअरच्या 'हॅम्लेट'चे त्यांनी ह्यविकारविलसितेह्ण या नावाने भाषांतर केले, त्याच्या प्रस्तावनेत हा सुधारणावाद आपल्याला दिसून येतो.

आगरकरांचे एक वेगळे वैशिष्ट्य मला अधोरेखित करावेसे वाटते. ते असे की, गांधीपूर्वकाळात सत्य अहिंसा व अपरिग्रह या गांधीवादी तत्त्वांचा अभ्यास आगरकरांमध्ये जाणवतो. अप्रिय पण पथ्यकर सांगण्याचा बाणा हे त्यांचा सत्यवादीत्वाचे उदाहरण आहे. आज आपण बलात्कार हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरतो. परंतु, आगरकरांनी हा शब्द सर्वसामान्य अर्थाने सामाजिक संदर्भात वापरला होता. कोणत्याही सामाजिक व्यवहारात अथवा सामाजिक संबंधांमध्ये बलात्कार नसावा, सर्व समाजजीवन संमतीच्या तत्वावर आधारित असावे, अशी त्यांची दृष्टी होती. ही दृष्टी म्हणजे अहिंसा या तत्त्वाचा परिपक्व आविष्कार म्हटला पाहिजे.

'स्वीकृत दारिद्र्य' हे आगरकरांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. पदवी प्राप्त केल्यानंतर मोठ्या पगाराच्या, अधिकाराच्या नोकरीकडे त्यांनी पाठ फिरवली आणि पोटापुरत्या पैशावर समाधान मानून समाजहितासाठी सर्व वेळ खर्च केला. आगरकरांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात जे स्पष्टीकरण दिले आहे, ती भाषा अपरिग्रहा आहे असे म्हणता येईल. 

आगरकरांचा सृष्टीविषयक विचारही मला विशेष वाटतो. प्रा.डी. के. बेडेकर यांच्या मते त्या काळातील गाढ निसर्गप्रेम महाराष्ट्रातील तत्त्वशोधनाच्या दृष्टीने महत्वाचे होते. आज कोरोनाने जागतिक पातळीवर उलथापालथ घडवली आहे. त्या पार्श्वभूमीवर समाजाची, देशाची आणि जगाची पुनर्रचना करण्यासाठी जे तत्त्वचिंतन आपल्याला करावे लागेल, त्यामध्ये आगरकर यांनी मांडलेला आणि गांधीजींनी विशेष विकसित केलेला सत्य, अहिंसा अपरिग्रह हा विचार आणि तत्कालीन विचारवंतांचे निसर्गविषयक चिंतन लक्षात घ्यावे लागेल. आगरकरांच्या स्मृतीचा उत्सव साजरा केला नाही तरी चालेल, मात्र, सृष्टीविषयक भान ठेवले तरीही ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

शब्दांकन : प्रज्ञा केळकर-सिंग

टॅग्स :Puneपुणेsocial workerसमाजसेवक