Good News - गणेशभक्त रिक्षाचालकाचा मुस्लीम नमाजीला मदतीचा हात
By Admin | Updated: August 29, 2016 19:37 IST2016-08-29T18:57:52+5:302016-08-29T19:37:40+5:30
गणेशभक्त रिक्षाचालकानं शुक्रवारच्या नमाजासाठी चाललेल्या मुस्लीम तरूणाला अनोखी मदत केली असून सोशल मीडियावर ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे

Good News - गणेशभक्त रिक्षाचालकाचा मुस्लीम नमाजीला मदतीचा हात
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - गणेशभक्त रिक्षाचालकानं शुक्रवारच्या नमाजासाठी चाललेल्या मुस्लीम तरूणाला अनोखी मदत केली असून सोशल मीडियावर ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. रमीझ शेख यांनी 26 ऑगस्ट रोजी घडलेला हा प्रकार विस्ताराने फेसबुकवर शेअर केला आहे.
शुक्रवारच्या नमाजासाठी शेख मशिदीत जाण्यासाठी निघाले आणि रिक्षेत बसल्यावर त्यांच्या लक्षात आले की पाकिट ऑफिसमध्येच राहिलं आहे. शेख यांनी गणेश उत्सवाचं स्टिकर रिक्षेवर लावत असलेल्या तिलकधारी रिक्षाचालकाला सांगितलं, की तुम्ही मशिदीजवळच थांबा, नमाज पढल्यावर मला पुन्हा ऑफिसमध्ये सोडा, मी सगळे पैसे देतो.
यावर शुक्लाजी असं नाव असलेल्या रिक्षाचालकानं सांगितलं की, तुम्ही देवाची प्रार्थना करायला जात आहात, काही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सोडतो मशिदीमध्ये. परंतु मला थांबता येणार नाही, कारण मला पुढे जायचं आहे. एवढं बोलून न थांबता, शुक्लाजींनी रमीझ यांना त्यांच्या परतीच्या रिक्षाप्रवासासाठी पैसे देऊ केले.
काही ओळख ना पाळख असं असूनही रिक्षाचालकानं केलेल्या या सौहार्दपूर्ण वागणुकीची दखल शेख यांनी फेसबुकच्या माध्यमातून घेतली आणि जवळपास 8,300 जणांनी हा मेसेज शेअर केला.
धार्मिक व जातीय तेढ निर्माण होण्याच्या घटना वाढत असताना अशा घटना चांगला संदेश देत आहेत.