सुदामनगरी रामभरोसे
By Admin | Updated: August 7, 2014 01:06 IST2014-08-07T01:06:22+5:302014-08-07T01:06:22+5:30
देशाच्या हृदयस्थानी असलेले नागपूर भौगोलिकदृष्ट्या सुरक्षित मानल्या जाते. परंतु माळीण येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ चमूने शहरातील काही वस्त्यांचा आढावा घेतला असता, अनेक वस्त्या पहाडीच्या

सुदामनगरी रामभरोसे
जीवाला घोर - प्रश्न कधी सुटणार ?
मंगेश व्यवहारे/जीवन रामावत - नागपूर
देशाच्या हृदयस्थानी असलेले नागपूर भौगोलिकदृष्ट्या सुरक्षित मानल्या जाते. परंतु माळीण येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ चमूने शहरातील काही वस्त्यांचा आढावा घेतला असता, अनेक वस्त्या पहाडीच्या पायथ्याशी असुरक्षितच नव्हे, तर तेथील हजारो नागरिक जीव मुठीत धरून जगत असल्याचे वास्तव पुढे आले. त्यापैकी हिलटॉप परिसरातील सुदामनगरी ही एक वस्ती आहे. या संपूर्ण वस्तीला पहाडीने वेढले आहे. त्या पहाडीवरून सतत कोसळणाऱ्या दरड व दगडांमुळे लोकांमध्ये दहशत आहे. येथे आजपर्यंत अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. त्यात कुणाच्या घराच्या भिंती पडल्या, तर कुणाचे घर जमीनदोस्त झाले. तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही. येथे शंभर ते दीडशे घरांची वस्ती आहे. त्यात राहणारी शेकडो कुटुंबे गत कित्येक वर्षांपासून दहशतीत जगत आहे.
दोन घरे जमीनदोस्त
काही वर्षांपूर्वी येथील गीताबाई झनकलाल व शीलाबाई कांबळे यांच्या घरावर दरड कोसळून त्यात त्यांची घरे जमीनदोस्त झाली. परंतु सुदैवाने त्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र दोन्ही कुटुंबांचा संसार उघड्यावर आला होता. त्यांना मुला-बाळांसह अनेक दिवस रस्त्यांवर काढावे लागले होते. शेवटी पै-पै गोळा करून, त्यांनी पुन्हा येथे आपले छोटेसे घर उभे केले. मात्र पहाडीवरून कोसळणाऱ्या दगडांमुळे त्यांच्या याही घरांना धोका निर्माण झाला आहे.