कऱ्हाडात रिक्षावाल्यांना ‘अच्छे दिन’!

By Admin | Updated: December 25, 2014 00:15 IST2014-12-24T21:53:22+5:302014-12-25T00:15:02+5:30

नव्या वर्षाच्या मुहूर्तावर ‘ड्रेसकोड’ : पोलीस उपधीक्षकांचा पुढाकार, शिस्तीसाठीही प्रयत्न

'Good day' for the people in Karachi! | कऱ्हाडात रिक्षावाल्यांना ‘अच्छे दिन’!

कऱ्हाडात रिक्षावाल्यांना ‘अच्छे दिन’!

कऱ्हाड : शहरातील रस्त्यांवर सध्या शेकडो रिक्षा धावतायत; पण कधी प्रवाशांशी होणाऱ्या वादामुळे तर कधी अंतर्गत कलहामुळे रिक्षा व्यवसाय वारंवार चर्चेत येतो. ज्यावेळी अशी वादाची प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतात, त्यावेळी त्याचा त्रासही रिक्षावाल्यालाच सहन करावा लागतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि या व्यावसायिकांना शिस्त लावण्यासाठी आता कऱ्हाडच्या पोलीस उपाधीक्षकांनीच पुढाकार घेतलाय. सर्व रिक्षा संघटनांनाही त्यासाठी सरसावल्या आहेत. कऱ्हाडसह परिसरामध्ये परवानाधारक रिक्षांची संख्या एक हजार सातशेच्या आसपास असून, प्रत्यक्षात चार हजारांहून अधिक रिक्षांमधून प्रवासी वाहतूक केली जात आहे. त्यामुळे परवानाधारक व्यावसायिकांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागतोय. कधी-कधी परवानाधारक व खासगी रिक्षा व्यावसायिकांमध्ये वादाचेही प्रसंग उद्भवतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी दोन दिवसांपूर्वी रिक्षा चालक-मालक संघटना व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह परिवाहन अधिकाऱ्यांची बैठक पार पडली़ बैठकीमध्ये रिक्षा चालक-मालकांच्या अडीअडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच उपाधीक्षक व परिवहन अधिकाऱ्यांनी त्यांना शिस्तीबाबत मार्गदर्शनही केली. दरम्यान, या व्यवसायाला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी रिक्षा चालक व मालकांचे व्यक्तिमत्त्व बदलण्याची गरज बैठकीवेळी व्यक्त झाली. रिक्षाचालकांनी प्रवासी वाहतुकीचे नियम पाळण्याबरोबरच त्यांना इतर सुचनाही बैठकीवेळी करण्यात आल्या. दरम्यान, १ जानेवारी २०१५ पासून शहरातल्या परवानाधारक रिक्षा चालकांसाठी खाकी पोशाख सक्तीचा करण्यात आला आहे. पोशाखावर बॅच असणेही बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच रिक्षाच्या मालकांसाठी पांढऱ्या रंगाचा पोषाख सक्तीचा करण्यात आला आहे. प्रवासी वाहतूक करताना ज्या रिक्षाचालक-मालकांकडे अधिकृत परवाना नसेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे व परिवहन अधिकारी चैतन्य कणसे यांनी पुढाकार घेतला असून, नववर्षामध्ये रिक्षा व्यावसायिकांनी प्रशासनास सहकार्य करून बदल घडवावा, असे आवाहन बैठकीदरम्यान करण्यात आले. (प्रतिनिधी)

 

रिक्षा संघटनांच्या मागण्या

बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी रिक्षांच्या कागदपत्रांची त्वरित तपासणी करून शासन नियमाप्रमाणे संबंधित रिक्षांचा रंग पांढरा असावा. परमिट उतरलेल्या रिक्षा तोच रंग व क्रमांकावर व्यवसाय करीत असून, त्यांच्यावर कारवाई व्हावी. परमिट असलेली रिक्षा कोणत्याही गेटवर थांबेल. गेटवर रिक्षा लावण्यास जो विरोध करेल, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. अ‍ॅपेरिक्षा शहरातून बाहेर जाताना व शहरात प्रवेश करताना त्यामध्ये चारच प्रवासी असावेत. रिक्षाचालक व काही वाहतूक पोलिसांमध्ये असलेल्या मित्रतेमुळे पोलीस आणि संघटनाही बदनाम होते. संबंधित पोलिसांना समज द्यावी. १ जानेवारीपासून रिक्षांच्या कागदपत्रांची तपासणी करून पोलिसांच्या वतीने तपासणी केलेल्या रिक्षावर स्टिकर लावण्यात यावेत.

 

सर्वसामान्यांच्या दृष्टीने रिक्षा हे प्रवासाचे महत्त्वाचे वाहन आहे. मात्र, दुर्दैवाने काही चालकांतील चुकीच्या प्रवृत्तीमुळे रिक्षा व्यावसायिकांची निष्ठा व उत्तरदायित्व याबाबत समाजामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होते. रिक्षाचालकाने वर्दी घातल्यास सुखद चित्र निर्माण होईल. - मितेश घट्टे, पोलीस उपाधीक्षक

Web Title: 'Good day' for the people in Karachi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.