मिनीमहाबळेश्वरातील जमिनीला आला सोन्याचा भाव

By Admin | Updated: February 3, 2015 00:01 IST2015-02-02T22:53:49+5:302015-02-03T00:01:22+5:30

निसर्गसौंदर्य भावले : जमिनीच्या खरेदीवर पुणे, मुंबईकरांचा डोळा

Gold price comes to land in Minimahabaleshwar | मिनीमहाबळेश्वरातील जमिनीला आला सोन्याचा भाव

मिनीमहाबळेश्वरातील जमिनीला आला सोन्याचा भाव

शिवाजी गोरे- दापोली - स्वातंत्र्यपूर्व काळात १८१८मध्ये ब्रिटिशांनी थंड हवेचे ठिकाण म्हणून सैनिकी तळ (कॅम्प) साठी दापोलीची निवड केली होती. याच दापोलीची अलिकडे मिनी महाबळेश्वर म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे. दापोली आता मुंबई - पुणेसह विविध राज्यांतील लोकांना भावू लागल्याने कोकणच्या मिनी महाबळेश्वरमध्ये अनेकजण जमिनी खरेदी करु लागले आहेत. दापोलीच्या निसर्गसौंदर्याने सर्वांना भुरळ घातल्याने दापोलीतील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे.
राज्यातील विविध भागांच्या तुलनेत कोकण प्रदेश आजही सुस्थितीत आहे. कोकणला लाभलेला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा कोकणचे खास आकर्षण आहे. येथील निसर्गसौंदर्याच्या पर्वतरांगा, लाल माती, दाट जंगल हे सगळं काही मन मोहून टाकणारं आहे. तसेच राज्यातील अनेक शहरात वाढते प्रदूषण, वाढत्या लोकवस्तीत दररोजची दगदग त्यामुळे शहरात दम घुसमटल्यासारखा होतो. शहरातील या धकाधकीच्या जीवनाला माणूस कंटाळला आहे.
शहरातील कोंदट हवा, दाट लोकवस्ती, कामासाठी होणारी पळापळ त्यातून जीवन जगणं फार कठीण होत चालले आहे. त्यामुळे माणूस पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात, मोकळ्या हवेत राहू पाहतोय. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूरसारख्या महानगरांसह राज्यातील विविध भागातील माणसे सेकंड होमच्या शोधात ओहत. एक घर शहरात तर दुसरे घर कोकणात असावे, असे अलिकडच्या काळात अनेकांची स्वप्न असतात. त्यामुळे प्रत्येकजण निसर्गसंपन्न दापोली मिनी महाबळेश्वरसारख्या ठिकाणाला अधिक पसंती देऊ लागले आहेत.
दापोलीतील जमिनीला १५ वर्षांपूर्वी कवडीची किंमत नव्हती. दापोली म्हणजे खेडेगाव अशीच ओळख अनेकजण करीत होते. दापोली तालुक्यातील खेडेगावात १५ ते ३० हजार रुपये एकरी शेतजमिनी विकल्या जात होत्या.
सन २००१नंतर मात्र हळूहळू परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. दापोलीच्या निसर्गसौंदर्याकडे अनेकांच्या नजरा वळल्या. २००१ नंतर दापोलीत जमीन घेण्यासाठी मुंबई, पुण्यातील अनेकांनी पसंती दिली. दापोली मिनी महाबळेश्वरची ओळख पुन्हा एकदा सर्वांना व्हायला लागली. एकराचे दर गुंठ्याला यायला लागला व दापोलीचा कायापालट सुरु झाला. आज दापोलीतील जमिनीचा दर गगनाला भिडला आहे. ५० हजार ते २ लाख रुपये गुंठा दर ग्रामीण भागातसुद्धा सांगितला जातो. तसेच शेतजमिनीचा दरसुद्धा आता गुंठे ५० हजार ते १ लाख रुपये सांगितला जातो. विशेष म्हणजे दापोली तालुक्यातील केळशी, आंजर्ले, हर्णै, मुरुड, कर्दे, पाळंदे, सालदुरे, लाडघर, बुरोंडी, कोळथरे, पंचनदी, आधारी, भीवबंदर, दाभोळ या समुद्रकिनारपट्टीच्या गावात या दराने जमिनी मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आल्या आहेत.
दापोली शहरात आता ५ ते १० लाख रुपये गुंठे दर येऊ लागला आहे. तसेच बांधकामाचा दर २ हजार ५०० ते ४००० हजार स्क्वेअर फुटापर्यंत पोहोचला आहे. दापोलीचे राहणीमान उंचावले असून पुणे - मुुंबई शहरातील सुविधा येथे निर्माण झाल्या आहेत.

दापोलीत सेकंड होमला अच्छे दिन
दापोली मिनीमहाबळेश्वरच्या निसर्गसौंदर्याची भुरळ अनेकांना पडल्यानंतर येथील जमिनीला चांगले दिवस आले. दापोलीत सेकंड होम असावं म्हणून अनेकांनी जागा खरेदी करुन आपले बंगलो उभारले आहेत. मुंबई - पुण्यात कामाच्या ठिकाणी एक बंंगलो व सेकंड होम म्हणून दापोली मिनी महाबळेश्वरमध्ये दुसरा बंगलो अशी प्रथाच अलिकडे पडली आहे. मुुंबई, पुणे, कोल्हापूर या मुख्य शहरापासून समान अंतरावर असणाऱ्या दापोलीला पुणे, मुंबई येथील लोकांची सर्वाधिक पसंती आहे.समुद्रकिनारी तर हे भाव दुप्पट आहेत.

मोजा एक कोटी...!
दापोली मिनीमहाबळेश्वरच्या नावाला साजेसे अनेक बंगलो प्रोजेक्ट दापोलीत निर्माण होत आहेत. आंजर्लेसारख्या छोट्या गावातसुद्धा २ कोटी रुपये किमतीची एक बंगलो स्किम सुरु आहे. दापोली जालगाव येथील गोल्ड व्हॅली, भवंजाळी शिवाजीनगर येथील गौरंग बंगलो स्किम, सुगी डेव्हलपर्सची बंगलो स्किम अशा प्रकारचे अनेक बिल्डर्सनी दापोली शहर व आजूबाजुच्या गिम्हवणे, जालगाव, टाळसुरे - खेर्डी, मौजे दापोली या शहरासह तालुक्यातील अनेक गावात सेकंड होम संकल्पना रुजू लागली आहे. दापोली तालुक्यात सेकंड होमची संख्या वाढली असून, अगदी ग्रामीण भागातही, समुद्रकिनाऱ्यावर अशा होम्सना विशेष पसंती असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जमिनीला सोन्याचा भाव आला आहे.

कोकणात सर्वाधिक पसंती दापोलीच्या निसर्ग सौंदर्याला.
मिनी महाबळेश्वरला आले शुभवर्तमान.
दापोलीतील जमिनीला आले सोन्याचे भाव.
दापोलीत जमिनीला १० वर्षात २० पट अधिक दर.
सेकंड होमसाठी पसंती.
अनेक नवे प्रकल्प दापोलीत.
केळशी, आंजर्ले, हर्णै गावात दराने खाल्ला भाव.

Web Title: Gold price comes to land in Minimahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.