सोन्याच्या दागिन्यांसह ६० हजारांचा ऐवज लंपास
By Admin | Updated: May 21, 2016 01:19 IST2016-05-21T01:19:51+5:302016-05-21T01:19:51+5:30
घरातील कपात उघडून कपाटातील दोन तोळे वजनाची साखळी, मंगळसूत्र अशा सोन्याच्या दागिन्यांसह रोकड आणि मोबाईल असा सुमारे ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून अज्ञात चोरट्याने पोबारा केला.

सोन्याच्या दागिन्यांसह ६० हजारांचा ऐवज लंपास
नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा शहरातील पालखी मार्गावरील पोलीस दूरक्षेत्रासमोर हाकेच्या अंतरावर असलेल्या प्राथमिक शाळेमागील घरात प्रवेश करून घरातील कपात उघडून कपाटातील दोन तोळे वजनाची साखळी, मंगळसूत्र अशा सोन्याच्या दागिन्यांसह रोकड आणि मोबाईल असा सुमारे ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून अज्ञात चोरट्याने पोबारा केला.
चोरीची ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास भर लोकवस्तीमध्ये घडली. याबाबत सचिन सुभाष इनामदार (रा. वॉर्ड नं. २, नीरा)
यांनी जेजुरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरा शहरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमागे सचिन इनामदार राहात आहेत. गुरुवारी पहाटे घरात ते झोपले असताना त्यांना त्यांची आई रजनी इनामदार यांनी उठवून अज्ञात मुलाने घरात चोरी करून पळाल्याचे सांगितले. घरातील कपाट उघडे दिसल्याने पाहणी केले असता, अज्ञात चोरट्याने कपाटाच्या लॉकरमधील दोन तोळ्याची साखळी, मंगळसूत्र या सोन्याच्या ऐवजासह पर्स आणि पाकिटातील रोकड रक्कम आणि मोबाईल असा सुमारे ६० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून पसार झाला. याबाबत जेजुरी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नीरा दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव, पोलीस हवालदार सुदर्शन होळकर, सुरेश गायकवाड पुढील तपास करत आहेत.