‘गोकुळ’चे निवृत्त ‘एम. डी.’ नेरुरकर यांचे निधन
By Admin | Updated: May 8, 2014 12:17 IST2014-05-08T12:17:10+5:302014-05-08T12:17:10+5:30
‘एम. डी.’ नेरुरकर

‘गोकुळ’चे निवृत्त ‘एम. डी.’ नेरुरकर यांचे निधन
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) निवृत्त कार्यकारी संचालक रमेश ऊर्फ आर. जे. नेरूरकर (वय ७५) यांचे दहिवाली हौसिंग सोसायटी, दहिसर (मुंबई) येथे आज (दि. ७) सकाळी आठ वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी पुष्पाताई, मुलगी उल्का राजाध्यक्ष असा परिवार आहे. नेरूरकर यांनी फेबु्रवारी १९८८ ते मार्च १९८९ या कालावधीत ‘गोकुळ’मध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले होते. राज्य शासनाच्या दुग्धविकास विभागाच्यावतीने नेरूरकर यांना प्रतिनियुक्तीवर ‘गोकुळ’मध्ये पाठवण्यात आले होते. त्यांनी या कालावधीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन संघाच्या कामकाजास गती देण्याचे काम केले. मुंबई शहरातील ‘गोकुळ’च्या नावावरील दूध विक्री करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नेरूरकर यांनी घेतला होता. या निर्णयामुळेच ‘गोकुळ’ला बळकटी मिळाली. एक अभ्यासू व धाडसी निर्णय घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते, सेवेत नसले तरी त्यांचे मार्गदर्शन सातत्याने राहिले. त्यांच्या निधनाने ‘गोकुळ’ पोरका झाल्याची भावना ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी व्यक्त केली. संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर व आर. जे. नेरूरकर यांच्यामुळे संघाचे नाव जागतिक पातळीवर पोहोचल्याचे संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी सांगितले. दरम्यान, संघाच्या प्रधान कार्यालयासह सर्वच शाखांमध्ये कर्मचार्यांच्यावतीने नेरूरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. (प्रतिनिधी)