देवाघरी गेली सारी फुले! मुलांच्या आठवणीने शिक्षक गहिवरले
By Admin | Updated: August 1, 2014 04:11 IST2014-08-01T04:11:58+5:302014-08-01T04:11:58+5:30
जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला...’ ही कविता मानसी मच्छिंद्र झांजरे ही सहावीतील चिमुरडी अतिशय सुंदर म्हणायची.

देवाघरी गेली सारी फुले! मुलांच्या आठवणीने शिक्षक गहिवरले
माळीण (जि. पुणे) : ‘जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला...’ ही कविता मानसी मच्छिंद्र झांजरे ही सहावीतील चिमुरडी अतिशय सुंदर म्हणायची. तिचा आवज अतिशय गोड होता. संगीत, कवायतीमध्ये ती नेहमी पुढे असायची. इतकी चुणचुणीत मुलगी आता दिसणार नाही, असे म्हणताना माळीण गावचे माजी मुख्याध्यापक वि.भा. गबाले यांना गहिवरून आले. मुले म्हणजे देवाघरची फुले म्हणतात, माळीण गावातील ३० ते ३५ मुले बुधवारच्या दुर्घटनेने खरोखरच देवाघरची फुले झाली
माळीण गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. येथे इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग आहे. शाळेचा पट ७२ आहे. यातील ३५ मुले गावातीलच आहे. बहुतांश मुले ही इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत म्हणजे १० ते ११ वर्षे वयाची होती. बुधवारच्या दुर्घटनेत जवळपास सर्व मुले बेपत्ता आहेत.
डोंगर कोसळला त्यावेळी बहुतांश लहान मुले ही घरातच होती. अनेकांवर झोपेतच काळाने घाला घातला. गावात भेटणारा प्रत्येक जण या मुलांच्या आठवणीने गहिवरून येत होता. शाळेचे मुख्याध्यापक सुरेश रोंगटे यांच्या डोळ्यासमोर तर प्रत्येक मुलाचा चेहराच बुधवारपासून फिरतो आहे. ते म्हणाले, गावातील ग्रामस्थ शाळेबाबतच्या कोणत्याही उपक्रमासाठी अतिशय अग्रेसर असायची. आठच दिवसांपूर्वी गावच्या फंडातून ई-लर्निंगसाठी ३० हजार रुपये दिले होते. गावातील तरुण मंडळी नेहमी शाळेला सहकार्य करण्यास तत्पर असायची. जीवाला जीव देणारे लोक होते. सुप्रिया गोरक्ष पोटे या सहावीतील मुलीचा चेहरा आठवला की अजूनही गहिवरून येते. अत्यंत चुणचुणीत असलेल्या सुप्रियाचा शिष्यवृत्तीमध्ये प्रथम क्रमांक आला होता. तिचे वडील पुण्यामध्ये पोलीस दलात होते. सुट्टी काढून ते भातलावणीसाठी घरी आले होते. मंदिराच्या मागच्या बाजुला त्यांचे घर होते. आज तेथे फक्त मातीचा ढिगारा आहे. बापलेक दोघेही मातीखाली गडप झाले आहेत, अशी वेदना त्यांनी व्यक्त केली. भारती पोटे आणि तान्हुबाई पोटे या गावातील महिला माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत मुलांसाठी खिचडी करायच्या. दररोज त्यांची शाळेला भेट असायची. आज त्या दोघीही नाहीत आणि त्यांची आवडती मुलेही नाहीत, असे सांगताना गबाले यांचा कंठ दाटला.