संघाच्या गोवा प्रांत बरखास्तीची घोषणा उद्या
By Admin | Updated: March 5, 2017 21:24 IST2017-03-05T21:24:12+5:302017-03-05T21:24:12+5:30
गोव्याचे संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली निर्माण करण्यात आलेल्या गोवा प्रांत संघाच्या बरखास्तीची घोषणा सोमवारी संध्याकाळी करण्यात येणार आहे.

संघाच्या गोवा प्रांत बरखास्तीची घोषणा उद्या
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 5 : गोव्याचे संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली निर्माण करण्यात आलेल्या गोवा प्रांत संघाच्या बरखास्तीची घोषणा सोमवारी संध्याकाळी करण्यात येणार आहे. सोमवारपासून गोव्यातील स्वयंसेवक हे कोंकण प्रांताशी पुन्हा संलग्न राहणार आहेत.
प्रांताच्या बरखास्तीचा निर्णय हा एकमताने घेण्यात आला असून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन ते जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती वेलिंगकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. नवीन प्रांताची निर्मितीही विशेष कारणासाठी आणि तात्पुरती व्यवस्था म्हणून करण्यात आली होती. तो बरखास्त करण्याचा निर्णयही तो निर्माण करतानाच ठरला होता, आता त्याची अंमलबजावणी होत आहे असे वेलिंगकर यांनी सांगितले.
बरखास्तीचा निर्णय हा अगोदर ठरलेला जरी असला तरी त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचे एकमत व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. चार विशेष बैठका घेण्यात आल्या होत्या. चौथी रविवारी झालेली बैठक ही दोन ठिकाणी झाली. उत्तर गोव्यासाठी पर्वरी येथे आणि दक्षीण गोव्याची मडगाव येथे. बैठकीत काही वेगळेही सूर निघाले होते, परंतु बरखास्तीच्या बाबतीत मात्र एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
तात्पुरती व्यवस्था म्हणून स्थापन करण्यात आलेला गोवा प्रांत माध्यम मुद्यावर जरी शिक्कामोर्तब झाले असले तर राजकीय आघाडी म्हणून स्थापन करण्यात आलेला गोवा सुरक्षा मंच मात्र तसाच ठेवला जाणार आहे. पक्षाचे भवितव्य पक्षाची कार्यकारणी ठरविणार आहे.
प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाच्या मुद्यावरून संघ आणि भाजपात बिनसल्यामुळे गोव्यात संघाने थेट भाजपाच्या विरोधात लढाईच पुकारली होती. त्यामुळे वेलिंगकर यांना संघचालक पदावरून कमी करण्यात आले होते. त्यानंतर सर्व संघ पदाधिकाऱ्यांनी पदे सोडली होती आणि आणि कोंकण प्रांताशी संलग्नता तोडून वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली गोवा प्रांताची स्थापना करण्यात आली होती.