‘आरएसएस’चं लक्ष्य.. नवीन शंभर शाखा !

By Admin | Updated: October 27, 2014 23:46 IST2014-10-27T21:09:23+5:302014-10-27T23:46:18+5:30

काळाचा महिमा : केंद्रातील सत्ताबदलानंतर जिल्ह्यात वीस शाखांची वाढ

The goal of 'RSS' .. new hundred branches! | ‘आरएसएस’चं लक्ष्य.. नवीन शंभर शाखा !

‘आरएसएस’चं लक्ष्य.. नवीन शंभर शाखा !

सातारा : केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. याला सातारा जिल्हादेखील अपवाद ठरलेला नसून जिल्ह्यात गेल्या शंभर दिवसांत जवळपास वीस शाखांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, संघ आणि संघाच्या विविध उपक्रमांत तरुणाईचा ओढा वाढत असल्यामुळे ‘आरएसएस’ने वर्षभरात जिल्ह्यात शंभर नवीन शाखा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
सातारा जिल्ह्यात १९३0 च्या दशकापासून ‘आरएसएस’चे काम सुरू आहे. सातारा येथील समर्थ शाखा आणि कऱ्हाड तालुक्यातील कोळे येथील शाखा सर्वात जुन्या मानल्या जातात. नाना पालकर, मुकुंदराव दाबके यांनी जिल्ह्यात ‘आरएसएस’ वाढीसाठी प्रयत्न केले. त्यामध्ये त्यांना काही प्रमाणात यशही आले.
आजमितीस मात्र सातारा जिल्ह्यातील ३0 गावांमध्ये ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ तथा ‘आरएसएस’च्या ५४ शाखा आहेत. यापैकी फक्त सोळा शाखा या सातारा तालुक्यात आहेत.
कऱ्हाड, वाई आणि फलटण तालुक्यांत ‘आरएसएस’ वाढत आहेत. माण तालुक्यातील आठ गावांमध्येही शाखा सुरू आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जिल्ह्यात वीस शाखांची वाढ तर झालीच त्याचबरोबर शंभर नवीन गावांमध्ये संपर्क यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
दोन महिन्यांपूर्वी सातारा शहरात ढगफुटी झाली होती. या काळात अनेक घरांमध्ये चुली पेटल्याच नाहीत. शहरातील ‘आरएसएस’च्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने लोकांना जेवण पोहोच केले होते. अजिंक्यतारा किल्ला साफसफाई मोहिमेतही सहभाग असतो. दरवर्षी सूर्यनमस्कार स्पर्धेत दहा हजार विद्यार्थी सहभागी होतात. ‘आरएसएस’च्या अखत्यारित ‘सामाजिक समरसता मंच’तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी साजरी केली जाते.
महाबळेश्वर, माण, खटाव आणि पाटण तालुक्यांत ‘आरोग्य रक्षक’ योजना राबविण्यात आली आहे. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून ‘विश्वमंगल गो-ग्राम योजना’ राबविण्यात येत आहे. डॉ. सुभाष दर्भे जिल्हा संघचालक तर जयवंत सामंत जिल्हा कार्यवाह आणि महेश शिवदे तालुका कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)
कोणत्या घटकांसाठी नेमके काय हवे, त्यांचे प्रश्न काय आहेत. यावरही आम्ही विचार करतो आणि त्या दृष्टीने स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत असतो. परिणामी आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येते.
- विठ्ठल बलशेटवार, जिल्हा कार्यवाह

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जिल्ह्यातील तरुणाईचा ओढा वाढत आहे. काही ठिकाणांहून स्वत:हून तरुण संपर्क साधत असून, त्यांनीही शाखा सुरू करण्याची विनंती केली आहे.
- मुकुंद आफळे, जिल्हा सहकार्यवाह

सातारा शहरात ११ जानेवारीला मोठे संचलन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सातारा शहरात ११ जानेवारी २०१५ रोजी मोठे संचलन होणार आहेएक हजार तरुण स्वयंसेवक गणवेशासह सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, यासाठी आतापासून संघाच्या १४८ मंडलांतून संपर्क मोहीम सुरू झाली आहे.

Web Title: The goal of 'RSS' .. new hundred branches!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.