गोवा महामार्गावर टँकरखाली चिरडून दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: September 22, 2016 03:06 IST2016-09-22T03:06:29+5:302016-09-22T03:06:29+5:30
भरधाव टँकरखाली चिरडून एका २३ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वाजता महाड शहरापासून ३ किमी अंतरावर घडली.

गोवा महामार्गावर टँकरखाली चिरडून दुचाकीस्वार ठार
महाड : मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव टँकरखाली चिरडून एका २३ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वाजता महाड शहरापासून ३ किमी अंतरावर घडली.
मास अब्दुल रहिमान शेखनाग (मूळ रा. नरवण, ता. महाड) असे या दुचाकीस्वाराचे नाव असून तो महाड औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यात कामासाठी दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीबरोबर टक्कर झाली. यात तो रस्त्यावर फेकला गेलेल्या मास शेखनागच्या अंगावरून मागून येणारा टँकर गेला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत दुचाकीवर बसलेला अल्पेश भरत जाधव हा जखमी झाला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी टँकर चालक बाबराम यादव (रा. उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून पो.नि. नंदकुमार सस्ते यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली.
मास शेखनाग हा गेल्या वर्षीच मॅकेनिकल इंजिनियर पास झाला होता. एक दोन वर्षांचा कामाचा अनुभव घेतल्यानंतर त्याला आखाती देशात नोकरीला जाण्याची इच्छा होती, मात्र त्याचे हे स्वप्न भंग पावले. मासच्या अपघाती निधनाने नरवण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमीवर महाड ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.