-तर १५ वाघ जिवानिशी जाणार
By Admin | Updated: August 27, 2014 00:54 IST2014-08-27T00:54:47+5:302014-08-27T00:54:47+5:30
महाराष्ट्रामध्ये सुरु असलेला वनरक्षक, वनपाल व वनमजुरांच्या बेमुदत संप लागलीच न मिटल्यास महाराष्ट्रातील १० ते १५ वाघांची शिकार केली जाण्याची दाट शक्यता वर्तविणारा अहवाल 'वाईल्ड लाईफ क्राईम

-तर १५ वाघ जिवानिशी जाणार
वन कर्मचाऱ्यांचा संप : 'वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्डा'चा इशारा
वैभव बाबरेकर - अमरावती
महाराष्ट्रामध्ये सुरु असलेला वनरक्षक, वनपाल व वनमजुरांच्या बेमुदत संप लागलीच न मिटल्यास महाराष्ट्रातील १० ते १५ वाघांची शिकार केली जाण्याची दाट शक्यता वर्तविणारा अहवाल 'वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्डा'ने पंतप्रधान कार्यालयाला पाठविला आहे. व्याघ्र प्रकल्पांवर नियंत्रणा ठेवणारे हे बोर्ड पंतप्रधानांच्या देखरेखीत कार्यरत आहे.
महाराष्ट्रातील १२ हजार वनरक्षक, २ हजार वनपाल आणि ५ हजार वन कामगारांनी विविध मागण्यांच्या पुर्तेतेसाठी बेमुदत कामबंद आंदोलन छेडले आहे. मंगळवार हा या आंदोलनाचा दुसरा दिवस असून कामबंद आंदोलनामुळे महाराष्ट्रातील वन्यप्राण्याच्या संरक्षणाबाबत मोठे संकट निर्माण झाले आहे. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्पांना बसला आहे. आधीच महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय तस्करांच्या रडारवर आहे. त्यातच वन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरु झाल्याने आंतरराष्ट्रीय तस्करांची टोेळी महाराष्ट्रातील जंगलामध्ये शिरण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) व वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्डाने दखल घेऊन तसा अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला आहे. व्याघ्र प्रकल्पांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्ड अस्तित्त्वात आहे. महाराष्ट्रामध्ये सहा व्याघ्र प्रकल्प असून येथे वाघांची सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे भारतामध्ये महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाला चौथ्या क्रमांकाचा दर्जा आहे.
जंगलात काम करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे ताडोबा, सह्याद्री, पेंच व मेळघाट या प्रदेशातील जंगल आंतरराष्ट्रीय तस्करांद्वारे लक्ष्य केले जाईल, अशी भीती पंतप्रधानांना पाठविण्यात आलेल्या अहवालात वर्तविण्यात आली आहे. पंतप्रधानांनी मध्यस्थी करुन राज्य सरकारशी चर्चा करावी व संप मिटविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही अहवालातून करण्यात आली आहे.