संघ सणांना ‘ग्लोबल’ करणार
By Admin | Updated: August 17, 2016 04:49 IST2016-08-17T04:49:37+5:302016-08-17T04:49:37+5:30
भारतीय संस्कृतीची ओळख जगासमोर व्हावी, या उद्देशाने भारतीय सण परदेशात साजरे करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतला आ

संघ सणांना ‘ग्लोबल’ करणार
योगेश पांडे, नागपूर
भारतीय संस्कृतीची ओळख जगासमोर व्हावी, या उद्देशाने भारतीय सण परदेशात साजरे करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतला आहे. रक्षाबंधनाच्या माध्यमातून याची सुरुवात होणार असून यानंतर इतरही सण टप्प्याटप्प्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याचा संघाचा मानस आहे.
इतर देशातील नागरिकांना भारतीय संस्कृती कळावी यासाठी संघाने प्रयत्न सुरू केले आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मागील महिन्यात आपल्या लंडन येथील दौऱ्यात इतर देशातील नागरिक तसेच संघनिष्ठ मंडळींशी याविषयावर चर्चा केली.
नवी दिल्ली येथे १७ आॅगस्टला आंतरराष्ट्रीय रक्षाबंधन महोसत्वाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी येथे ४५ हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील व त्यांना रक्षाबंधनाची महती सांगण्यात येईल, अशी माहिती मिळाली.
हा संस्कृतीचा प्रसारच : आज जगातील विविध देशांमध्ये अनेक समस्या आहेत व भारताकडे आशास्थान म्हणून पाहिले जात आहे. सण, संस्कृतीचे सारथी असतात व भारतीय सणांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणे आवश्यक आहे. रक्षाबंधनापासून आम्ही याची सुरुवात करणार असलो तरी टप्प्याटप्प्याने इतर सणांनादेखील ‘ग्लोबल’ ओळख देण्याचा आमचा विचार आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांनी दिली.