मद्यनिर्मितीऐवजी शेतकऱ्यांना पाणी द्या !
By Admin | Updated: January 20, 2015 01:27 IST2015-01-20T01:27:30+5:302015-01-20T01:27:30+5:30
मराठवाड्याला मद्यनिर्मिती व औद्योगिकीकरणाला पाणी देण्याऐवजी नगर जिल्ह्यातील उद्ध्वस्त शेतकऱ्यांना पाणी द्यावे,

मद्यनिर्मितीऐवजी शेतकऱ्यांना पाणी द्या !
लोणी (अहमदनगर) : मराठवाड्याला मद्यनिर्मिती व औद्योगिकीकरणाला पाणी देण्याऐवजी नगर जिल्ह्यातील उद्ध्वस्त शेतकऱ्यांना पाणी द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
जायकवाडी धरणात आवश्यकता नसतानाही पाणी सोडण्यात आले. त्यामुळे वरच्या भागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. सध्या पाण्याचे फक्त राजकीय वाटप चालू असून, सामाजिक न्यायाची भूमिका जलसंपदा खात्याने घ्यावी. नाशिक महानगरपालिका जोपर्यंत पाणी शुद्ध करीत नाही तोपर्यंत इंडिया बुल्स कंपनीला पाणी देऊ नये, असे स्पष्ट करीत आघाडी सरकारचा निर्णय बाजूला ठेवून तातडीने समन्यायी पाणी वाटपाचा वाद समोपचाराने मिटवावा, असेही त्यांनी म्हटले आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्याचे पुनर्विलोकन करावे. हा राज्याच्या व जिल्ह्याच्या ऐक्याला धोका ठरणारा आहे. शेतीला प्रथम पाणी देण्याचे धोरण केंद्र सरकारने ठरविले असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. अनेक वर्षांत नवीन धरणे झालेली नाहीत. कोकणातील पाणी तुटीच्या खोऱ्यात वळविण्यास दुर्लक्ष होत असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. (वार्ताहर)