‘एक दिवस पूर्ण विश्रांती द्या’
By Admin | Updated: October 20, 2016 05:49 IST2016-10-20T05:49:52+5:302016-10-20T05:49:52+5:30
एसटी महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी यांनी चालक-वाहकांना एक दिवस पूर्ण विश्रांती देण्याचे निर्देश आगार व्यवस्थापक आणि वाहतुक पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांना दिले आहेत

‘एक दिवस पूर्ण विश्रांती द्या’
मुंबई : प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येवू नये या हेतूने एसटी महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी यांनी चालक-वाहकांना एक दिवस पूर्ण विश्रांती देण्याचे निर्देश आगार व्यवस्थापक आणि वाहतुक पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांना दिले आहेत. याबाबतचे परिपत्रकच जारी करण्यात आले आहे.
दरवर्षी एसटी महामंडळाचे सुमारे ३000 अपघात होतात आणि त्यापैकी जवळपास ५00 प्राणांतिक अपघात असतात. हे अपघात कमी करण्यासाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. यात चालक-वाहकाची भूमिका ही महत्वाची ठरते. एसटी महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी विनीत अग्रवाल यांनी मुळ पगार कमी असणाऱ्या चालक-वाहकांना प्राधान्य दिले पाहिजे. परंतु प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने कोणत्याही चालक व वाहकाने सहा दिवस काम केले तर त्याला एक दिवस पूर्ण विश्रांती दिली पाहिजे, असे निर्देश दिले आहेत. तसेच कुठल्याही परिस्थीतीत चालक व वाहकांकडून महिन्याला ८0 तासांपेक्षा जास्त अतिरिक्त काम करुन घेऊ नये याची जबाबदारी आगार व्यवस्थापक व आगारातील संबंधित वाहतुक पर्यवेक्षकीय कर्मचारी यांची राहिल,असेही नमूद करण्यात आले आहे. आगारात चालक,वाहक यांची कमतरता असल्यामुळे डबल ड्युटी नाईलाजाने लावणे आवश्यक असेल तर त्याची आगार व्यवस्थापक यांना पूर्ण माहिती असली पाहिजे की,एका महिन्यात किती कर्मचाऱ्यांना डबल ड्युटी द्यावी लागणार आहे. त्यासाठी आवश्यक शेड्युल निश्चित करुन ते वेगळे करण्यात यावे आणि त्याचे स्वतंत्र रोटेशन लावावे. या सूचनांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
एसटी कामगार सेनेचा विरोध
परिपत्रक प्रशासनाकडून काढले जाते. हे परिपत्रक योग्य नाही. त्याला आमचा विरोध आहे. जर एखादा चालक, वाहक गैरहजर असेल तर अन्य कर्मचाऱ्याला ड्युटी लावताना अनेकदा विचार करायला हवा, याप्रमाणे परिपत्रकातून निर्देश देण्यात आले आहेत.
- शिवाजीराव चव्हाण,
एसटी कामगार सेना-कार्याध्यक्ष
>परिपत्रक योग्य
सुरक्षेच्या दृष्टिने हे परिपत्रक योग्य आहे आणि ते अधिकाऱ्यांनी स्विकारले पाहिजे. चालक-वाहकांच्या दृष्टिनेही ते उपयुक्त आहे.
- श्रीरंग बरगे, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस-सरचिटणीस