मित्रांना योग्य वेळी न्याय देऊ
By Admin | Updated: January 18, 2015 01:02 IST2015-01-18T01:02:20+5:302015-01-18T01:02:20+5:30
विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत आलेल्या मित्रपक्षांनी आम्हाला सत्तेत वाटा कधी मिळणार असा थेट सवाल मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या भरगच्च कार्यक्रमात केला.
मित्रांना योग्य वेळी न्याय देऊ
मुख्यमंत्र्यांचे मित्रपक्षांना आश्वासन : ‘शिवसंग्राम’चा १३वा वर्धापन दिन
मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत आलेल्या मित्रपक्षांनी आम्हाला सत्तेत वाटा कधी मिळणार असा थेट सवाल मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या भरगच्च कार्यक्रमात केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत वाटा देण्याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, कुणीही काळजी करण्याची गरज नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
शिवसंग्राम पक्षाचा १३वा वर्धापन दिन शनिवारी परळ येथील कामगार मैदानात झाला. यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आदी उपस्थित होते.
आम्ही सर्व सुखाने नांदत असून विरोधकांनी तर आमच्यात फाटाफुट होण्यासाठी देव पाण्यात ठेवले. मात्र याचा आमच्यावर काहीच परिणाम होणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री तुम्हा सर्वांना न्याय देतील, अशी ग्वाही पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली. मराठ्यांना योग्य ते आरक्षण देऊन त्यांचा सर्वांगिण विकास करावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
मेटेंनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आम्हाला एकत्र आणले, त्यामुळे आईसमोर रडण्याची संधी मिळाली, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आम्ही तुमच्या सोबत असून त्यांच्या इच्छेखातर आम्हाला सत्तेत वाटा देऊन न्याय द्या, काँग्रेस- राष्ट्रवादीसमोर आम्हाला उघडे करू नका, असे आवाहन जानकर यांनी केले. (प्रतिनिधी)
शिवसंग्राम संपविण्याचा पवारांचा प्रयत्न
मला व शिवसंग्राम संपविण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केल्याचा आरोप मेटे यांनी केला. आमच्या पायगुणामुळे तुम्ही सत्तेत आलात, मात्र आम्हालाच सत्तेपासून बाजूला ठेवल्याचे मेटे म्हणाले.