मागेल त्याला प्रवेश द्या!
By Admin | Updated: July 18, 2014 01:01 IST2014-07-18T01:01:40+5:302014-07-18T01:01:40+5:30
बारावी उत्तीर्ण झालेला कुठलाही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी महाविद्यालयांना १० टक्के जागांचा बोनस देण्यात यावा, असे निर्देश राज्य शासनाने दिले होते. परंतु मागेल त्याला प्रवेश

मागेल त्याला प्रवेश द्या!
राज्य शासनाचे निर्देश : विद्यापीठात २९ महाविद्यालयांना मिळाली जागा वाढ
नागपूर : बारावी उत्तीर्ण झालेला कुठलाही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी महाविद्यालयांना १० टक्के जागांचा बोनस देण्यात यावा, असे निर्देश राज्य शासनाने दिले होते. परंतु मागेल त्याला प्रवेश मिळालाच पाहिजे अशी भूमिका घेत वेळ पडली तर महाविद्यालयांना अधिक जागा वाढवून देण्याचे निर्देश राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला दिले आहेत.
यंदा बारावीच्या निकालात १६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. त्यामुळे बारावीचा निकाल लागून महिना उलटला असला तरी अनेक विद्यार्थ्यांचे अद्याप प्रवेश झालेले नाहीत. ही बाब लक्षात घेता राज्य शासनाने महाविद्यालयांना १० टक्के जागा वाढ देण्यासंदर्भात विद्यापीठाला पत्र लिहिले होते. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम ८३ (३)(सी) नुसार विद्यापीठाला प्रवेशक्षमता मंजुरीच्या असलेल्या अधिकारांतर्गत मंजूर प्रवेश क्षमतेच्या १० टक्के जास्तीच्या प्रवेशाचा निर्णय विद्वत परिषदेत घेण्यात आला होता. परंतु अनेक ठिकाणी १० टक्के जागा वाढदेखील पुरेशी नसल्याच्या तक्रारी जनप्रतिनिधींनी राज्य शासनाकडे केल्या होत्या. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंना १० टक्के अतिरिक्त वाढीऐवजी जर जागा वाढवून देणे शक्य असेल तर त्यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी सूचना केली आहे.
विद्यापीठाने माहितीच दिली
नसल्याची महाविद्यालयांची तक्रार
किमान शिक्षक नियुक्तीच्या कडक निकषांमुळे नागपूर विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांनी विनाअनुदानित जागांवर प्रवेश देणे बंद केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भटकंती करावी लागत आहे. विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये या शासनाच्या निर्देशांनुसार विद्यापीठाच्या अखत्यारितील महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेत १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु यासंदर्भात माहितीच देण्यात आली नसल्याचे काही महाविद्यालयांनी सांगितले आहे. यासंदर्भात ‘बीसीयूडी’ संचालक (बोर्ड आॅफ कॉलेज अॅन्ड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट) डॉ. श्रीकांत कोमावार यांच्याशी संपर्क साधला असता यात तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर संबंधित पत्र असल्याचा उल्लेख त्यांनी केला.(प्रतिनिधी)
महाविद्यालयांना मिळाला जागांचा ‘बोनस’
महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमात मंजूर प्रवेश क्षमतेनुसार, प्रथम वर्षाचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतरही विद्यार्थी प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीत असल्यास १० टक्के जास्तीचे प्रथम वषार्साठी प्रवेश मंजूर करण्याकरिता विद्यापीठाकडे तसा प्रस्ताव सादर करावा अशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या होत्या. काही महाविद्यालयांनी अशा आशयाच्या सूचना प्राप्त झाल्या नसल्याचे म्हटले असले तरी बऱ्याच महाविद्यालयांनी मात्र विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठविले होते. यानुसार गुरुवारी २९ महाविद्यालयांना प्रभारी कुलगुरूंच्या मान्यतेनंतर वाढीव जागांसाठी मंजुरी देण्यात आली.