राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्या !
By Admin | Updated: January 20, 2015 01:56 IST2015-01-20T01:56:27+5:302015-01-20T01:56:27+5:30
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने सरकारने राज्याला एक पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विख-पाटील यांनी येथे केली़

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्या !
अहमदनगर : राज्याचे पोलीस महासंचालक डोईजड झाले आहेत़ प्रशासनावर कुणाचाही वचक राहिला नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने सरकारने राज्याला एक पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विख-पाटील यांनी येथे केली़
ते म्हणाले, गेल्या १५ दिवसांत लातूर, पाथर्डी, हिंगोली जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना भयानक आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. आयएसआय व अल-कायदासारख्या संघटनांनी दहशतवाद निर्माण केला आहे. पोलीस महासंचालक स्वत:ला मुख्यमंत्र्यांपेक्षाही मोठे समजू लागले आहेत़ ही बाब गंभीर आहे़ पोलीस महासंचालक हितसबंध असलेल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत़ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता सरकारने राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा. याबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे. अन्यथा आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
ऊस दराबाबत ते म्हणाले, एफआरपीनुसार भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे़ मात्र साखरेच्या दरावर सरकारचे नियंत्रण नाही़ एफआरपी आणि साखर दरातील फरकाची जबाबदारी सरकारने स्वीकारावी़ सरकार केवळ कायद्याचा बडगा दाखवत आहे़ त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल़ जनता त्यांना माफ करणार नाही. (प्रतिनिधी)