मुंबई : औरंगाबाद महापालिकेत ज्या पद्धतीने गोष्टी घडत आहेत ते पाहता आता तिथे राज्य सरकारला हस्तक्षेप करावाच लागेल. औरंगाबाद महापालिका बरखास्त करावी, ही मागणी तर आम्ही करतच आहोत. पण, त्याशिवाय एखादा तरुण, डॅशिंग आयुक्त औरंगाबादला पाठवा. निवृत्ती जवळ आलेला किंवा शिक्षा म्हणून औरंगाबादला आयुक्त पाठवल्यामुळेच औरंगांबाद महापालिकेत अनागोंदी कारभार सुरु असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सतीश चव्हाण यांनी केली.औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर विधान परिषदेत अल्पकालीन चर्चा झाली. यावेळी सतीश चव्हाण म्हणाले की, कच-याचा प्रश्न सुटेपर्यंत महापालिकेवर प्रशासक नेमण्यात यावा. तसेच मुख्यमंत्री कच-याचा प्रश्न सोडवण्यासाठी जो निधी देणार आहेत, तो खर्च करण्याची व्यवस्था करावी. घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेचे महापौर आणि नगरसेवक तीन वेळा परदेशात अभ्यास दौ-यासाठी जाऊन आले आहेत. यांचे परदेश दौरे झाले परंतु औरंगाबादचा कचरा प्रश्न तसाच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या नगरसेवक, महापौरांकडून परदेश अभ्यास दौ-याचा अहवाल मागून घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.खदाणीत कचरा टाकण्याचा पर्याय समोर मांडला जात आहे. मात्र, खदाणीमध्ये कचरा टाकला तर सहा किलोमीटरच्या परिघातील पाणी दुषित होण्याची शक्यता आहे. जसे नरेगाव येथे कच-यामुळे गावकरी त्रस्त झाले. त्याप्रमाणेच खदाणीच्या आजुबाजुला राहणा-या लोकांनाही त्रास होईल, असेही चव्हाण म्हणाले.
औरंगाबादला डॅशिंग आयुक्त द्या- सतीश चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 8:25 PM