मागास भागातही स्वस्त वीज द्या !
By Admin | Updated: September 24, 2015 01:26 IST2015-09-24T01:26:32+5:302015-09-24T01:26:32+5:30
विदर्भ, मराठवाडा या मागास भागातील उद्योगांना स्वस्त दरात वीजपुरवठा करण्याकरिता ऊर्जा खात्याने समिती स्थापन केली असून, त्या समितीला उर्वरित महाराष्ट्रातील

मागास भागातही स्वस्त वीज द्या !
मुंबई : विदर्भ, मराठवाडा या मागास भागातील उद्योगांना स्वस्त दरात वीजपुरवठा करण्याकरिता ऊर्जा खात्याने समिती स्थापन केली असून, त्या समितीला उर्वरित महाराष्ट्रातील अतिमागास औद्योगिक विभागांनाही सवलतीचा लाभ देण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पालघर जिल्ह्यातील वाडा येथील स्टील उद्योजकांसोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन बुधवारी केली.
मागास भागातील ऊर्जा सवलतीकरिता उर्वरित महाराष्ट्रातील डी-प्लस क्षेत्रातील उद्योगांचा विचार केला गेला तर वाडा, धुळे, नंदूरबार, सातारा, सांगली, सोलापूर आदी राज्यातील काही जिल्ह्यांमधील मागास भागात उद्योग उभारणाऱ्या उद्योजकांनाही लाभ होईल, असे देसाई यांनी सांगितले.
मागास भागात उद्योग टिकून राहावे याकरिताही वीजदरात सवलत देणे गरजेचे आहे, असे देसाई यांनी सांगितले. राज्याच्या ऊर्जा खात्याने मराठवाडा व विदर्भ या मागास भागातील उद्योगांना सवलतीच्या दराने वीजपुरवठा करण्याकरिता अधिकाऱ्यांची समिती तयार केली आहे. या समितीला पालघर जिल्ह्यातील वाडा येथील स्टील उद्योगांनाही वीजदरात सवलत देण्याचे आदेश राज्यघटनेच्या ३७१(२) कलमानुसार राज्यपालांनी द्यावे, अशी मागणी देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली. वाडा येथील स्टील उद्योजक सरकारला ३५० कोटी रुपयांचा विक्रीकर भरतात. येथील विजेचे दर विदर्भ व मराठवाड्यापेक्षा जास्त आहेत. (विशेष प्रतिनिधी)