अल्पसंख्यांकांसाठी ३००० हजार कोटी द्या- ओवैसी
By Admin | Updated: February 4, 2015 14:59 IST2015-02-04T11:15:26+5:302015-02-04T14:59:07+5:30
ऑल इंडिया मजलिस-ए इत्तिहादूल मुस्लिमीनचे (ए.आय.एम.आय.एम) संघटनेच्या सभेला अखेर परवानगी मिळाली असून कोंढव्यातील कौसरबाग कार्यालयामध्ये ही सभा होणार आहे.

अल्पसंख्यांकांसाठी ३००० हजार कोटी द्या- ओवैसी
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ४ - मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाहीये, मात्र मुस्लिमांना आरक्षण मिळावे अशी मागणी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.
एमएआयएमच्या पुण्यातील सभेला परवानगी देण्यात आल्यानंतर एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुस्लिम नागरिक शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागास आहेत, हे उच्च न्यायालयानेही मान्य केले आहे, असे ते म्हणाले. तसेच सद्यस्थिती ही सुदृढ लोकशाहीसाठी पोषक नसल्याचे मतही त्यांनी मांडले. आगामी अर्थसंकल्पात अल्पसंख्यांकासाठी ३००० हजार कोटींची तरतूद करावी अशी मागमी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान ऑल इंडिया मजलिस-ए इत्तिहादूल मुस्लिमीनचे (ए.आय.एम.आय.एम) संघटनेच्या सभेला अखेर परवानगी मिळाली असून कोंढव्यातील कौसरबाग कार्यालयामध्ये ही सभा होणार आहे. एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या गोळीबार मैदानातील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर सभेसाठी कोंढव्यातील कौसरबाग मंगल कार्यालयाचे ठिकाण निश्चित करण्यात आले व त्याबाबत पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली. आज पोलिसांनी परवानगी दिल्याने आता बंद सभागृहात ही सभा होईल.
मूलनिवासी मुस्लिम मंच, अॅक्शन कमिटी यांच्या वतीने माजी न्यायमूर्र्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले, या परिषदेला ओवैसींना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. मात्र शिवसेनेने या कार्यक्रमात ओवैसीनी चिथावणीखोर भाषण केल्यास ही सभा उधळून लावू, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
कॅन्टोमेंट बोर्डाने गोळीबार मैदान हे केवळ व्यावसायिक व विवाह समारंभासाठी दिले जात असल्याचे स्पष्ट करून आयोजकांना मैदानाचे ताबापत्र दिले नव्हते. त्यानंतर पोलिसांनीही या सभेला परवानगी नाकारली होती. या पार्श्वभूमीवर आयोजकांनी मंगळवारी पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांची भेट घेतली. बंद सभागृहामध्ये सभा घेण्याची त्यांनी पोलिसांकडे तयारी दर्शविली. त्यानुसार कौसरबाग कार्यालयात ही सभा पार पडेल.
शिवसेना करणार आंदोलन
ओवेसींच्या सभेला परवानगी दिल्याच्या निषेधार्थ शिवसेना आज दुपारी आंदोलन करणार आहे.