२० लाख द्या, तुमचा विजय निश्चित!
By Admin | Updated: July 31, 2014 03:59 IST2014-07-31T03:59:16+5:302014-07-31T03:59:16+5:30
नरेंद्र मोदी यांनी मीडिया मॅनेजमेंट, सोशल मीडियाचा खुबीने वापर केल्याने ते लोकसभा निवडणुकीत जिंकले

२० लाख द्या, तुमचा विजय निश्चित!
यदु जोशी, मुंबई
नरेंद्र मोदी यांनी मीडिया मॅनेजमेंट, सोशल मीडियाचा खुबीने वापर केल्याने ते लोकसभा निवडणुकीत जिंकले असा दृढ समज झालेले सर्वच राजकीय पक्षांचे लहानमोठे नेते आता पीआर एजन्सी, माध्यम तज्ज्ञांच्या नादी लागले आहेत. नेत्यांच्या बंगल्यांवर, कार्यालयांमध्ये, विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये सध्या अशा या इलेक्शन गुरुंची लगबग दिसत आहे. या शिवाय सर्वेक्षण या शब्दाचा सध्या राजकीय वर्तुळात जबरदस्त बोलबाला आहे.
एकेका मतदारसंघात निवडणुकीच्या दृष्टीने सर्वेक्षण करून देणाऱ्या एजन्सी आणि व्यक्तींचे सध्या एकच पेव फुटले आहे. जननेता, नेत्यांचा नेता, कल्पक नेता, मीडिया गुरू, जननायक अशा वेगवेगळ्या नावांनी या एजन्सी थाटण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणाचे काम आमच्यावर सोपवा, आम्हाला अमूक रक्कम द्या, आम्ही सर्वेक्षणापासून विजयापर्यंतचे अख्खे पॅकेज तुम्हाला देतो, अशी आॅफर इच्छुक उमेदवारांना दिली जात आहे. अनेक जण त्यासाठी पैसा खर्च करीत आहेत. १०, २०, ३० लाख असे पॅकेज आॅफर केले जात आहे.
‘तुमच्या मतदारसंघात आम्ही सर्वेक्षण करू, आता उरलेल्या दोन महिन्यांत कशी प्रसिद्धी मिळविली पाहिजे, त्यासाठी काय काय केले पाहिजे, कोणते छापील साहित्य वाटले पाहिजे, होर्डिंग कुठे लावले पाहिजेत, त्यावर मजकूर काय असला पाहिजे, निवडणुकीसाठी घोषणा कोणत्या असाव्यात, व्हॉटस् अप, फेसबूकवर कसा प्रचार करायचा याचे मंत्र सांगितले जात आहेत. मंत्री, राजकीय पक्षांची कार्यालये, विद्यमान आमदार, आमदारकीसाठीचे काही इच्छुक त्यांच्यामुळे त्रस्त आहेत.
निवडणूक कशी जिंकायची याचे फॉर्म्यूले विकले जात आहेत. काँग्रेसच्या कार्यालयात एक पोल गुरु भेटला. तो म्हणाला मी फक्त मतदानाच्या दिवशीची व्यवस्था करतो. म्हणजे, मतदान केंद्रांवर असलेल्या कार्यकर्त्यांना फूड पॅकेटस् पोहोचविणे, मतदानाच्या आधी आणि त्या दिवशी मतदारांना स्लिप्स् पोहोचविणे, मतदानाच्या आदल्या रात्री करावी लागणारी व्यवस्था आदी. त्याला काँग्रेसच्या कार्यालयात कोणी दाद दिली नाही.