मुली, सून, नातवंडे नि:शब्द...
By Admin | Updated: February 22, 2015 02:23 IST2015-02-22T02:23:03+5:302015-02-22T02:23:03+5:30
सून मेघा पानसरे, नातवंडे कबीर आणि मल्हार यांच्या अश्रूंचा बांध फुटत होता...हजारो लोक धीर देत होते, सांत्वन करत होते पण पानसरे कुटुंबीय नि:शब्द होते...

मुली, सून, नातवंडे नि:शब्द...
कोल्हापूर : माझ्या बाबांनी कुणाचे काय वाईट केले होते?..अशी दु:खद प्रतिक्रिया देणारी गोविंद पानसरे यांची कन्या मेघा पानसरे-टिक्के, स्मिता सातपुते, सून मेघा पानसरे, नातवंडे कबीर आणि मल्हार यांच्या अश्रूंचा बांध फुटत होता...हजारो लोक धीर देत होते, सांत्वन करत होते पण पानसरे कुटुंबीय नि:शब्द होते...
दुपारी सव्वा एकच्या दरम्यान अण्णांचे पार्थिव दसरा चौकात आणण्यात आले. व्यासपीठावर कार्यकर्त्यांनी शवपेटी उघडताच अण्णांच्या मुली, सून आणि नातवंडांनी हंबरडा फोडला. किती तरी वेळ अण्णांच्या पार्थिवाजवळ बसून एकमेकींच्या गळ््यात पडून रडत होत्या.
...अन् मेघा पानसरे-टिक्की रुग्णालयात परतल्या...
पानसरेंवरील उपचारासाठी मुलगी स्मिता सातपुते आणि मेघा पानसरे मुंबईला गेल्या होत्या. लहान मुलगी मेघा पानसरे-टिक्की या आईसोबत अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये थांबल्या होत्या. मेघा या आपल्या पित्याच्या अंत्यदर्शनासाठी दसरा चौकात आल्या. मात्र उमा पानसरे मेघा कुठे गेली? अशी विचारणा करत असल्याचे समजल्यानंतर त्या पुन्हा दवाखान्यात परतल्या.
पोरकी झाले...
अण्णांच्या जाण्याने आज मला खऱ्या अर्थाने पोरकी झाल्यासारखं वाटतंय. माझ्या आयुष्यात जी काही स्थित्यंतरे घडली, त्या सगळ्यांशी लढण्याचे बळ अण्णांनी मला दिले. चळवळीत काम करण्याची ताकद कशी असते, हे मी त्यांच्याकडे बघून शिकले. समाजासाठी ते प्रेरणास्थान होतेच; पण माझाही आधारवड होते. आता मला हे बळ गेल्यासारखं वाटतंय.
- मेघा पानसरे, स्नुषा
लेक होण्याचे
भाग्य मिळाले
विचाराने आणि तत्त्वाने खूप मोठ्या माणसाची लेक असण्याचे भाग्य मला मिळाले. वडील म्हणून त्यांचा धाक होताच; पण आम्हा भावंडांशी त्यांचे मैत्रीपूर्ण नातेही होते. आपले आचरण आणि विचार हेच सूत्र ठेवून त्यांनी आम्हाला वाढविले. ‘पप्पा गेले’ हे वाक्य ऐकले, तो प्रसंग पचवणे खूप अवघड आहे.
- स्मिता सातपुते, मुलगी
राज्यभरातील कार्यकर्ते अंत्ययात्रेत
भाकपचे राज्य अधिवेशन शनिवारपासून सुरू होणार होते; त्यामुळे भाकपचे राज्यभरातून कार्यकर्ते अधिवेशनासाठी आले होते; परंतु त्यांना आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्ययात्रेतच सहभागी होण्याची दुर्दैवी वेळ आली. अनेक कार्यकर्ते पत्नी व मुलांना घेऊन अंत्ययात्रेत सहभागी झाले.