लालबागच्या राजाच्या दरबारात पोलिसांची तरुणीला बेदम मारहाण
By Admin | Updated: September 28, 2015 12:56 IST2015-09-28T12:56:44+5:302015-09-28T12:56:44+5:30
मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दरबारात पोलिसांनी एका तरुणीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

लालबागच्या राजाच्या दरबारात पोलिसांची तरुणीला बेदम मारहाण
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दरबारात पोलिसांनी एका तरुणीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. महिला पोलिसांनी संबंधीत तरुणीला गुन्हेगाराप्रमाणे मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर या घटनेची उपायुक्त स्तरावर चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत.
मिरारोड येथे राहणारी एक तरुणी शुक्रवारी रात्री तिच्या कुटुंबासमवेत लालबागच्या राजाच्या दर्शनाला आली होती. राजाच्या दर्शनासाठी संबंधीत तरुणीने व्हीआयपी गेटमधून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावरुन तिथे उपस्थित असलेल्या महिला पोलिस व संबंधीत तरुणीत वाद निर्माण झाला. वादानंतर महिला पोलिसांनी तरुणीला मारहाणीचा प्रयत्न केला. तरुणीच्या भावाने व आईने पोलिसांना रोखण्याचा प्रयत्नही केला. मात्र दोघा महिला पोलिसांनी तरुणीला मारहाण केली व त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणा-या तरुणीच्या आईलाही पोलिसांनी मारहाण केली. यानंतर संबंधीत तरुणीला काळाचौकी पोलिस ठाण्यात नेण्यात आले व १२०० रुपयांचा दंड आकारुन तिला सोडण्यात आले.
मारहाणीचा प्रकार कॅमे-यात कैद झाला असून सोमवारी हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महिला पोलिसांच्या या कृत्यावर सर्वस्तरातून निषेध होत असून मुंबई पोलिसांनीही घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.