नवऱ्याला संपवण्यासाठी मुलीच्या बॉयफ्रेंडची मदत
By Admin | Updated: December 4, 2015 16:21 IST2015-12-04T15:59:53+5:302015-12-04T16:21:27+5:30
पिंपरी-चिंचवाडमध्ये वाल्हेकरवाडी येथे चार दिवसांपूर्वी पडलेल्या दरोडा प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. नवऱ्याला संपवण्यासाठी मुलीच्या बॉयफ्रेंडची मदत घेतल्यात उघड झाले आहे.

नवऱ्याला संपवण्यासाठी मुलीच्या बॉयफ्रेंडची मदत
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ४ - पिंपरी-चिंचवाडमध्ये वाल्हेकरवाडी येथे चार दिवसांपूर्वी पडलेल्या दरोडा प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. मुलीच्या प्रियकराच्या मदतीनेच नवऱ्याच्या खुनाचा कट रचल्याची धक्कादायक माहिती चौकशीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी फिर्यादी मधुकर पाटील यांच्या पत्नीसह तेजस घाडगे आणि कुशल धस्ते या आरोपींना अटक केली आहे.
>काय आहे प्रकरण ?
चिंचवड येथील वाल्हेकरवाडी परिसरात असलेल्या रजनीगंधा सोसायटीत राहणाऱ्या पाटील यांच्या घरावर रविवारी रात्री पाच जणांच्या टोळक्याने दरोडा टाकला होता. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पाटील हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास करत असताना पाटील यांच्या पत्नीच्या जवाबामध्ये विसंगती आढळत असल्यामुळे पोलिसांना त्यांचा संशय आला. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनीच दरोड्याचा बनाव रचून आपल्या पतीचा खून करण्याची योजना बनविल्याचे कबूल केले.
> पती मधुकर पाटील हे सतत मारहाण करून त्रास देत असत. या मारहाणीला कंटाळून आपल्या मुलीच्या प्रियकराला हाताशी धरून पतीच्या खुनाची योजना तयार केली होती. यासाठीच दरोड्याचा बनाव रचला होता, अशी कबुली मधुकर पाटील यांच्या पत्नीने दिली आहे. या प्रकरणी आणखी तीन आरोपी फरार असून चिंचवड पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.