प्रेयसीला व्हिडिओ कॉल करून प्रियकराची आत्महत्या
By Admin | Updated: June 20, 2017 11:08 IST2017-06-20T09:46:53+5:302017-06-20T11:08:54+5:30
प्रेयसीबरोबर झालेल्या वादातून एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

प्रेयसीला व्हिडिओ कॉल करून प्रियकराची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
उल्हासनगर, दि. 20- सोशल मीडियाचा वापर आपण सगळेच करतो आहे. चांगले-वाईट असे दोन्हीही प्रकारचे परिणाम सोशल मीडियाच्या वापरामुळे दिसून येत आहेत. पण सध्या मात्र सोशल मीडिया किती घातक ठरतो आहे, याची अनेक उदाहरणं बघायला मिळत आहेत. असाच एक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. प्रेयसीबरोबर झालेल्या वादातून एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पण यामध्ये धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या तरूणाने प्रेयसीला व्हिडीओ कॉल केला आणि त्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली आहे. उल्हासनगरमध्ये हा प्रकार घडला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरूणीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगरमधील कॅम्प नंबर पाचच्या जवळ असलेल्या एनक्लेव्ह रेसिडेन्सीमध्ये राहणारा हनी याचे नालासोपारातील राखी पात्रा या तरुणीशी प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी वाद होऊन त्यांच्यातील नातं संपल होतं. पण नंतर तो वाद मिटल्याने त्यांनी लग्न करण्याचंही ठरवलं होतं. काही दिवसांपूर्वी ते दोघं भेटले पण त्यावेळी त्यांच्यात किरकोळ गोष्टींवरून वाद झाला. यानंतर हनी याने घरी परतल्यानंतर बेडरूममधील पंख्याला लटकून आत्महत्या केली. आत्महत्या करत असताना त्याने राखीला व्हिडीओ कॉल केला आणि आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. पण राखीसुद्धा त्यावेळी रागात असल्याने तिने त्याला आत्महत्या करण्यापासून न रोखता आत्महत्या करून दाखवच असं आव्हान दिलं होतं, असा आरोप हनीच्या वडिलांनी केला. या प्रकरणी राखी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
विशेष म्हणजे तब्बल 20 दिवसांनंतर हा संपूर्ण प्रकार हनीचे वडील नरेश आसवानी यांना समजला. त्यानंतर त्यांनी हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये 18 जून रोजी हनीच्या प्रेयसीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. तर व्हॉट्सअॅप कॉलचा व्हिडीओ मिळतो का? याच्या प्रयत्नात पोलीस आहेत.