घारापुरीत मित्रानेच केली मैत्रिणीची हत्या
By Admin | Updated: November 7, 2014 04:49 IST2014-11-07T04:49:18+5:302014-11-07T04:49:18+5:30
उरणमधून सात महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या युवतीची तिच्या मित्रानेच हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वर्षा सुनील पडते (२१, रा. विनायक केगाव) असे तिचे नाव आहे.

घारापुरीत मित्रानेच केली मैत्रिणीची हत्या
उरण : उरणमधून सात महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या युवतीची तिच्या मित्रानेच हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वर्षा सुनील पडते (२१, रा. विनायक केगाव) असे तिचे नाव आहे. तिच्या मित्राने सात महिन्यांपूर्वीच तिला घारापुरी बेटावरील निर्जन जंगलात नेले होते आणि तिची गळा आवळून हत्या केली होती. मोरा सागरी पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. प्रवीण म्हात्रे (२६, रा. घारापुरी) याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. त्याला १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
परिचारिका असणाऱ्या वर्षाचा विवाह ठरला होता. विवाहाच्या दोन दिवस आधी ती आमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र त्यानंतर लग्नाचा दिवस उजाडल्यानंतरही वर्षा घरी न परतल्याने कुटुंबीयांनी मोरा सागरी पोलीस ठाण्यात २४ एप्रिलला तक्रार दाखल केली. जाताना ती मोबाइल सोबत घेऊन गेली होती, मात्र मोबाइलवरूनही तिचा थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे मित्र-मैत्रिणींची चौकशी करण्यात आली. वर्षा प्रवीणच्या संपर्कात असल्याचे आणि त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे उघड झाले.
प्रवीणला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने वर्षा ज्या दिवशी बेपत्ता झाली त्याच दिवशी तिला घारापुरी बेटावर नेऊन तिचा गळा आवळून खून केल्याचे कबूल केले. तिचा मृतदेह जंगलात निर्जन ठिकाणी पुरून ठेवल्याची माहिती त्याने दिली. तपास अधिकारी व पोलीस निरीक्षक ए.एस. पठाण पथकासह घटनास्थळी गेले आणि पुरलेला मृतदेह ताब्यात घेतला. अन्य साथीदारांचाही शोध पोलीस घेत आहेत. (वार्ताहर)