ती युवती गोवा पोलिसांच्या कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2017 02:05 IST2017-05-17T02:05:48+5:302017-05-17T02:05:48+5:30
उल्हासनगर येथील बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार दिल्याच्या आरोपाखाली मध्य प्रदेशातील एका युवतीला गोवा पोलिसांनी अटक केली.

ती युवती गोवा पोलिसांच्या कोठडीत
- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : उल्हासनगर येथील बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार दिल्याच्या आरोपाखाली मध्य प्रदेशातील एका युवतीला गोवा पोलिसांनी अटक केली. तपासामध्ये सर्व पुरावे तिच्याविरुद्ध गेल्याची माहिती गोव्यातील अंजुना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय दळवी यांनी मंगळवारी दिली.
उल्हासनगर येथील किशोर केसवानींविरुद्ध गोवा पोलिसांनी मार्च २0१६मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यामध्ये केसवानी यांनी गोव्याच्या न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला. आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केसवानी यांनी आॅक्टोबर २0१६मध्ये गोव्यातील अंजुना पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी केसवानी यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडित युवतीसह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला.
घटनेच्या वेळी केसवानी हे मुंबईत होते. काही सीसीटीव्ही फुटेजवरून ते स्पष्ट झाले असल्याची माहिती अंजुना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय दळवी यांनी दिली. ज्या हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार झाला होता, त्या हॉटेलमधील कर्मचारी किशोर केसवानी यांना ओळखू शकले नाहीत. वैद्यकीय तपासणीमध्येही अत्याचाराचे पुरावे मिळाले नाहीत. न्यायालयाने तिला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.