मुलीला पळविणाऱ्यांंसह तर्राट पोलिसांना डांबले
By Admin | Updated: July 30, 2016 02:26 IST2016-07-30T02:26:27+5:302016-07-30T02:26:27+5:30
कर्जत तालुक्यातील कोपर्डीची घटना ताजी असतानाच याच तालुक्यातील भांबोरा गावात शुक्रवारी नववी इयत्तेतील एका विद्यार्थिनीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा

मुलीला पळविणाऱ्यांंसह तर्राट पोलिसांना डांबले
कर्जत (अहमदनगर) : कर्जत तालुक्यातील कोपर्डीची घटना ताजी असतानाच याच तालुक्यातील भांबोरा गावात शुक्रवारी नववी इयत्तेतील एका विद्यार्थिनीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, जागृत ग्रामस्थांमुळे तिची सुखरूप सुटका झाली. तिला पळवून नेणाऱ्या तरुणांसह नशेत तर्र असलेल्या पोलिसांना संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात रात्रीपर्यंत कोंडून ठेवले.
भांबोरा-दुधवडी रस्त्याने विद्यार्थिनी शाळेत जात असताना रणदिवे वस्तीजवळ पाच तरुणांनी तिला अडवून ओढत उसाच्या शेतात नेले. त्यांचा दुष्ट हेतू लक्षात येताच तिने जीवाच्या आकांताने ठोकलेली आरोळी तिच्या चुलत भावाने ऐकली. त्याने लगेच गावकऱ्यांना आवाज देत उसाच्या शेताकडे धाव घेतली. सात-आठ जणांमुळे मुलीची सुटका झाली. ग्रामस्थ जमल्याने तरुणांनी पळ काढला. यातील तिघांना ग्रामस्थांनी पाठलाग करुन पकडले व चोप दिला. घटनेची माहिती मिळताच राशीन पोलीस दूरक्षेत्र चौकीचे दोन पोलीस व एक होमगार्ड तेथे पोहोचले. त्यांनी आरोपींना जीपमध्ये बसविले. फरार दोघांना कधी पकडणार, असे विचारल्यानंतर ग्रामस्थ व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. संतप्त ग्रामस्थांनी आरोपींसह पोलिसांनाही ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. पोलीस गाडीवर दगडफेकही केली. (प्रतिनिधी)
पोलिसांच्या रक्ताचे नमुने
पोलिसांच्या जीपमध्ये दारुच्या बाटल्या आढळल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा पारा चढला. पोलिसांच्या वैद्यकीय तपासणीसाठी त्यांनी आंदोलन सुरू केले. त्यामुळे भांबोरा गावात तणावपूर्ण वातावरण होते. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. नगरहून पोलीस अधीक्षक या गावाकडे रवाना झाले होते. पोलीस कर्मचाऱ्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. पोलीस दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी सांगितले.