उ. प्रदेशातून पळालेली तरुणी पुन्हा गायब
By Admin | Updated: April 24, 2017 02:26 IST2017-04-24T02:26:22+5:302017-04-24T02:26:22+5:30
उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर येथून आपल्या शेजाऱ्यासोबत एक तरुणी पळून आली होती. तिचा शोध घेण्यासाठी तिचा भाऊ मुंबईत आला.

उ. प्रदेशातून पळालेली तरुणी पुन्हा गायब
कल्याण : उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर येथून आपल्या शेजाऱ्यासोबत एक तरुणी पळून आली होती. तिचा शोध घेण्यासाठी तिचा भाऊ मुंबईत आला. त्याने तिचा शोध घेऊन तो तिला परत उत्तर प्रदेशात घेऊन जात असताना ती कल्याण स्थानकातून पुन्हा गायब झाली. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तरुणीच्या भावाने तक्रार दिली आहे.
तरुणी उत्तर प्रदेशातून शेजाऱ्यासोबत पळून आली. तिच्या शोधासाठी तिचा भाऊ हुसेन हा मुंबईतील घाटकोपर परिसरात आला होता. २० एप्रिलला त्याने घाटकोपर गाठले. त्या ठिकाणी आझादनगरमध्ये मोहसीन नावाच्या तरुणाने तरुणीला पळवून आणले होते. तरुणासोबत तरुणी एका महिलेच्या घरी राहत होती. ही महिला व तरुणाने तिला आमिष दाखवून पळवून आणले होते. ही गोष्ट तरुणीच्या घराशेजारी राहणाऱ्या इक्बालने तिच्या भावाला सांगितली होती. तिच्या शोधासाठी भावासोबत इक्बालही घाटकोपरमध्ये आला होता.
बहिणीचा शोध लागल्यावर तिला पुन्हा उत्तर प्रदेशात नेण्यासाठी हुसेनने कल्याणला आणले. २२ एप्रिलला पुष्पक एक्स्प्रेस पकडायची होती. हुसेन तिकीट घेण्यासाठी गेला होता. तो तिकीट घेऊन परतला, त्या वेळी त्याची बहीण त्या ठिकाणी नव्हती. तिचा शोध घेतला, तेव्हा कुठेही आढळली नाही. अखेरीस, कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता ती दिसली नाही. रविवारी पुन्हा काही रेल्वे स्थानकांतील सीसीटीव्ही पाहण्याचा प्रयत्न केला असता ती तरुणी खंडाळा रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना दिसली. (प्रतिनिधी)