मुलीने रोखला स्वत:चा बालविवाह!
By Admin | Updated: January 21, 2016 03:37 IST2016-01-21T03:37:33+5:302016-01-21T03:37:33+5:30
आई-वडील जबरदस्तीने लावत असलेल्या लग्नाला विरोध करीत, १५ वर्षांच्या मुलीने पोलिसांकडे धाव घेत स्वत:चाच बालविवाह रोखला.
मुलीने रोखला स्वत:चा बालविवाह!
पुणे : आई-वडील जबरदस्तीने लावत असलेल्या लग्नाला विरोध करीत, १५ वर्षांच्या मुलीने पोलिसांकडे धाव घेत स्वत:चाच बालविवाह रोखला. एवढचे नव्हे, तर तिने आई-वडिलांविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचेही धाडस दाखविले. पुणे पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षाने तिला साथ देत, तिच्या आई-वडिलांसह नियोजित पती आणि त्याच्या कुटुंबीयांना कायद्याचा हिसका दाखवला.
मंगळवार पेठेत राहणारी आशा (बदललेले नाव) अकरावीत आहे. तिचे वडील रिक्षाचालक तर आई गृहिणी आहे. आॅगस्ट २०१५ मध्ये तिचे वडील व काकांनी तिचे लग्न ठरविण्यास सुरुवात केली. विरोध केल्यानंतर तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत, लग्नाला तयार केले.
आशाने पुन्हा लग्नास विरोध केल्याने तिच्यावर कुटुंबीयांनी मानसिक व शारीरिक अत्याचार केले. नियोजित मुलाशी (२५) लग्न केले नाही, तर मारून टाकण्याची धमकी तिला पुन्हा देण्यात आली. त्याच्याशी वारंवार फोनवर बोलण्याची सक्तीही तिच्यावर करण्यात आली. कुटुंबीयांचा अत्याचार वाढल्याने आशाने तिच्या चुलत आजी-आजोबांकडे धाव घेतली. त्यांनीच तिला दीड महिने सांभाळले. वडिलांकडून तिच्यावर पाळत ठेवली जात होती, तसेच रस्त्यात गाठून ते मारहाणही करत होते. शेवटी त्यांच्या त्रासाला कंटाळून, आशाने आजी आजोबांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्त्या प्रणिता जगताप यांची मदत घेतली आणि तक्रार केली.