पडघ्यातील गिफ्टचा स्फोट जिलेटीनमुळे?
By Admin | Updated: July 31, 2016 03:12 IST2016-07-31T03:12:07+5:302016-07-31T03:12:07+5:30
शुक्रवारी गिफ्टच्या बॉक्समधील बाटलीचा स्फोट झाल्याने त्यामागचे कारण शोधण्यासाठी बॉम्बशोधक, श्वान पथक आले होते.

पडघ्यातील गिफ्टचा स्फोट जिलेटीनमुळे?
पडघा/भिवंडी : पडघ्यापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या खालिंगमध्ये शुक्रवारी गिफ्टच्या बॉक्समधील बाटलीचा स्फोट झाल्याने त्यामागचे कारण शोधण्यासाठी बॉम्बशोधक, श्वान पथक आले होते. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक महेश पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. अद्याप तरी स्फोटामागील गूढ कायम आहे. या घटनेनंतर खालिंग गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. या बाटलीत द्रवस्वरूपातील जिलेटीन होते, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या महिलेवर मुंबईतील के.ई.एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खालिंग गावात जीवन आणि अजित घरत यांचा कुरिअरचा व्यवसाय आहे. त्याच्या दुचाकीला अनोळखी व्यक्तीने प्लास्टिक पिशवी लावलेली होती. पिशवीत असलेल्या खोक्यावर ‘अजितसाठी स्पेशल गिफ्ट असून फक्त हे गिफ्ट तूच उघड’ असे लिहिले होते. त्याने हे गिफ्ट न उघडता घरीच ठेवले होते. कुतूहलापोटी अजितची आई नंदा ऊर्फ रेखा यांनी गुरुवारी रात्री बॉक्स उघडला. त्यातील बाटलीचे झाकण उघडले असता अचानक स्फोट झाला. यात त्यांचा हात पंजापासून वेगळा झाला. त्यांच्या डोळ्यालाही इजा झाली. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, त्याच्या आवाजाने संपूर्ण गाव हादरले. ग्रामस्थ त्यांच्या घराकडे धावले. नंदा जखमी झाल्यामुळे त्यांना वेदान्त रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने केईएममध्ये हलवले. घटनेची माहिती शुक्रवारी उशिरा पडघा पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. बाटलीतील द्रव पदार्थाचा स्फोट झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. (प्रतिनिधी, वार्ताहर)
।अजितला मारण्याचा हेतू?
हे गिफ्ट अजितच्या गाडीला कुणी लावले, स्फोटक द्रव्य ठेवण्यामागील हेतू काय, हे द्रव्य कुठून आणले, याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.
अजितच्या चौकशीतूनच नेमका प्रकार उघड होईल. स्फोट करून अजितला मारण्याचा उद्देश होता की, घाबरवण्याचा हेतू होता, या दिशेनेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झाली नसली तरी लवकरच आरोपींना पकडू, अशी माहिती पडघा पोलीस ठाण्याचे निरीक्षक भास्कर पुकले यांनी दिली.