शिवसेनेमुळे गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द
By Admin | Updated: October 8, 2015 05:47 IST2015-10-08T05:47:18+5:302015-10-08T05:47:18+5:30
‘कल चौदहवीं की रात थी...’, ‘ये दिल ये पागल दिल मेरा..’ आणि ‘हंगामा है क्यूँ बरपा...’ अशा एकाहून अनेक सरस गझला लोकप्रिय करणारे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील

शिवसेनेमुळे गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द
मुंबई : ‘कल चौदहवीं की रात थी...’, ‘ये दिल ये पागल दिल मेरा..’ आणि ‘हंगामा है क्यूँ बरपा...’ अशा एकाहून अनेक सरस गझला लोकप्रिय करणारे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील पटियाला घराण्याचे गायक गुलाम अली हे केवळ पाकिस्तानी नागरिक असल्याच्या कारणाने शिवसेनेने केलेल्या विरोधामुळे शुक्रवारी ९ आॅक्टोबर रोजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात होणारा त्यांचा गझल गायनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
सीमेवर भारतीय सैनिकांवर पाकिस्तानकडून भ्याड हल्ले होत असताना गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द केला नाही तर शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करील, असा इशारा शिवसेनेने दिला होता. त्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी सायंकाळी भेट घेऊन कार्यक्रम रद्द केल्याची माहिती दिली.
गुलाम अली यांच्या गझल गायनाचा कार्यक्रम शुक्रवारी ९ आॅक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र त्यास शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस अक्षय बर्दापूरकर यांनी विरोध दर्शविला होता. षण्मुखानंद सभागृहाच्या व्यवस्थापनाची भेट घेऊन हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली होती. (विशेष प्रतिनिधी)
शिवसेनेची हिंदुत्ववादी भूमिका झाली ताठर
शिवसेनेने यापूर्वीही गुलाम अलींच्या कार्यक्रमाला विरोध केला होता. नुसरत फतेहअली खान यांचा कार्यक्रमही शिवसेनेने होऊ दिला नव्हता. तसेच भारत-पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सामने खेळवण्यासही शिवसेना सतत विरोध करीत आली आहे. मात्र पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांनी दिलीप वेंगसरकर यांच्यासोबत मातोश्रीवर जाऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती.
मुख्यमंत्र्यांनी दिली होती हमी
अली यांच्या कार्यक्रमाकरिता पुरेसा पोलीस बंदोबस्त दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र तरीही संयोजकांनी कार्यक्रम रद्द केला.
सोयीस्कर विसर ?... अली यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध केला असला तरी गेल्या वर्षी २१ नोव्हेंबर २०१४ रोजी याच षण्मुखानंद सभागृहात गझल गायन केले होते. त्या वेळी शिवसेनेने कोणतीही भूमिका घेतली नव्हती. आता त्यांनी सोयीचे राजकारण केल्याची चर्चा आहे.
गुलाम अली केवळ एक गायक नव्हे तर शांतिदूत आहेत, त्यांना सीमेचे बंधन असू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला होणारा विरोध दुर्दैवी आहे.
- मुख्तार अब्बास नकवी, केंद्रीय मंत्री
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील गुलाम अली यांचे फॅन आहेत. भारतीय जवानांवर गोळीबार होत असताना पाकिस्तानी गायकाच्या गझला ऐकणे योग्य होणार नाही, ही शिवसेनेची भूमिका पटल्याने आपण हा कार्यक्रम रद्द करत आहोत.
- रणधीर धीर, कार्यक्रम संयोजक