गुलाम अली गुरुवारी मुंबईत, पोलीस संरक्षणाची मागणी
By Admin | Updated: January 25, 2016 13:40 IST2016-01-25T13:40:59+5:302016-01-25T13:40:59+5:30
पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली अखेर गुरुवारी मुंबईमध्ये येत असून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे.

गुलाम अली गुरुवारी मुंबईत, पोलीस संरक्षणाची मागणी
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली अखेर गुरुवारी मुंबईमध्ये येत असून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. सुहेब इलियासी यांच्या घर वापसी या चित्रपटाच्या म्युझिक लाँचचा कार्यक्रम शुक्रवीरी मुंबईत होणार असून गुलाम अली त्यासाठी येणार असल्याचं इलियासी यांनी म्हटलं आहे. या चित्रपटात गुलाम अलींनी भूमिका केली असून एक देशभक्तीचं गाणंही म्हटलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार या दोघांनी गुलाम अली साहेबांच्या या भेटीसाठी पुरेसं संरक्षण द्यावं अशी विनंती इलियासी यांनी केली आहे. गेल्यावर्षी गुलाम अलींच्या कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध केला होता, परिणामी गुलाम अलींचा मुंबई व पुण्याचा नियोजित दौरा रद्द करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या या कार्यक्रमाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
गुलाम अलींना विशेष अतिथीसारखा मान मिळावा अशी अपेक्षाही इलियासी यांनी व्यक्त केली आहे. घर वापसी हा चित्रपट असहिष्णूतेवरील वाद विवादावर असल्याचे इलियासी यांनी IANS या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे. चित्रपटांमध्ये समाजाचे प्रकटीकरण होत असते, आणि या सिनेमातही भारतात घडत असलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आल्याचे इलियासी यांनी म्हटले आहे.