गुलाम अली खान डेंग्यू कलाकार - गायक अभिजीतची जीभ घसरली
By Admin | Updated: October 9, 2015 09:57 IST2015-10-09T09:25:22+5:302015-10-09T09:57:16+5:30
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्यने गुलाम अलींना ' दहशतवादी देशातील डेंग्यू कलाकार' म्हणत त्यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली

गुलाम अली खान डेंग्यू कलाकार - गायक अभिजीतची जीभ घसरली
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - ज्येष्ठ गझलगायक गुलाम अली खान यांचा पुणे, मुंबईतील कार्यक्रम रद्द करण्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला वाद आता आणखीनच चिघळला असून बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्यने गुलाम अलींना ' डेंग्यू कलाकार' म्हणत त्यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली. ' गुलाम अली यांचा शो रद्द झाला. कितीही वेळा हाकललं तरी या निर्लज्ज लोकांना आत्मसन्मानच नाही, ना (त्यांच्याकडे) कोणतही काम. त्यांच्याकडे फक्त 'दहशतवाद' आहे. प्रेस्टिट्यूट'प्रमाणे आपण त्यांनाही पोसत आहोत, ' असे शेलक्या शब्दांतील ट्विट त्याने केले आहे.
इतकचं नव्हे तर त्याने ट्विटरवरून मीडिया व राजकीय पक्षांवरही टीका केली आहे. 'आपले राजकीय पक्ष फक्त भुंकत असतात. हे कव्वाल त्यांच्या पात्रतेमुळे नव्हे पाकिस्तानी दलाल व प्रेस्टिट्यूटमुळे इथे येतात. कथित हिंदू राजकीय नेते व पक्ष फक्त बोलबच्चन असून ते फायद्यासाठी आरडाओरड करतात, पण दहशतवादी देशांमधून आलेल्या अशा डेंग्यू कलाकारांविरोधात ते कोणतीच कारवाई करत नाहीत' अशा खालच्या पातळीवरील शब्दांत टीका करत अभिजीतने मुक्ताफळे उधळली आहेत.
दरम्यान गुलाम अलींच्या कॉन्सर्टला विरोध करून तो रद्द करण्याच्या भूमिकेचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी समर्थन केले आहे. ज्या पाकिस्तानमुळे आपले जवान शहीद होतात, त्या देशाला आचमा विरोध आहे, कलाकारांना नव्हे. आम्ही जे केले ते आमचे राष्ट्रीय कर्तव्य होते, असे करून आम्ही शहीदांना खरी श्रद्धांजली वाहिल्याचे उद्धव यांनी म्हटले आहे.