सागरी विमानसेवेला घरघर!
By Admin | Updated: December 1, 2014 01:54 IST2014-12-01T01:54:51+5:302014-12-01T01:54:51+5:30
वादग्रस्त ठरलेल्या जुहू ते मुळा धरण सी प्लेन सेवेचे अखेर तीनतेरा वाजले आहेत. चार महिन्यांत केवळ चार उड्डाणे झाली

सागरी विमानसेवेला घरघर!
राहुरी (जि. अहमदनगर) : वादग्रस्त ठरलेल्या जुहू ते मुळा धरण सी प्लेन सेवेचे अखेर तीनतेरा वाजले आहेत. चार महिन्यांत केवळ चार उड्डाणे झाली असून, विमान सेवा देणारी कंपनी गाशा गुंडाळण्याच्या मन:स्थितीत असल्याची विश्वसनीय माहिती आहे़
शनिशिंगणापूर, शिर्डीचे साईबाबा व मेहेरबाबा या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांच्या पार्श्वभूमीवर सागरी विमान सेवा सुरू करण्यात आली़ मुळा धरणावर तयार करण्यात आलेल्या चौथऱ्यावर सी प्लेन उतरण्याची सुविधा करण्यात आली होती़ चौथऱ्यापासून धरणाच्या धक्क्यापर्यंत येण्यासाठी बोटीची व्यवस्था करण्यात आली होती़ मोठ्या प्रमाणावर प्रवासी उपलब्ध होतील, असा कंपनीचा दावा होता़ त्या दृष्टिकोनातून तिकीट बुकिंगची सुविधा करण्यात आली होती़
मुळा धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कायम असताना विमान सेवा सुरू झाली़ विमान सेवेला सुरुवातीला प्रकल्पग्रस्तांनी विरोध केला़ मात्र कंपनीशी तडजोड करून प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन मागे घेतले़ हवाई उड्डाणाचा मार्ग मोकळा झाला असताना विमानसेवा बंद करण्याच्या विचारापर्यंत कंपनी आली आहे़ श्रीमंतांसाठी असलेली सेवा, असा प्रचार झालेल्या या सेवेकडे भाविक व पर्यटकांनी पाठ फिरविल्याने कंपनीने गाशा गुंडाळण्याचे ठरवले आहे़
नोव्हेंबरमध्ये मुळा धरणावर एकदाही सी प्लेन उतरले नाही़ त्यामुळे विमानसेवा बंद तर झाली नाही ना, अशी शंका व्यक्तकरण्यात येत आहे़ याबाबत कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, संपर्क होऊ शकला नाही़ (वार्ताहर)