एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 06:03 IST2019-02-26T06:03:51+5:302019-02-26T06:03:55+5:30
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडची प्रतीक्षा कायम : कोल्हापूर खंडपीठाच्या आदेशानंतर महामंडळाचा निर्णय

एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा
मुंबई : कोल्हापूर औद्योगिक न्यायालयाने सोमवारी दिलेल्या आदेशामुळे राज्यातील बहुतांश विभागांतील एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विभागातील कर्मचाऱ्यांना पुढील आदेश मिळेपर्यंत बदलीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
तूर्तास राज्यातील मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, अकोला, बुलडाणा आणि यवतमाळ विभागातील कर्मचाºयांना बदलीसाठी कार्यमुक्त करण्याचे आदेश महाव्यवस्थापक माधव काळे यांनी सोमवारी दिले आहेत. संबंधित विभागांत विनंती बदलीसाठी अर्ज केलेल्या चालक व वाहक संवर्गातील कर्मचाºयांना या आदेशामुळे दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे इतर विभागांतील कर्मचाºयांबाबत स्थगिती उठवल्याने संबंधित कर्मचाºयांना बदलीच्या ठिकाणी तत्काळ हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे आदेशही काळे यांनी विभाग नियंत्रकांना दिले आहेत. तसेच कर्मचाºयांना कार्यमुक्त केल्याचा अहवाल उलट टपाली वाहतूक भवन कार्यालयास पाठवण्याचे आदेशही काळे यांनी दिले आहेत.
दरम्यान, रत्नागिरी विभागातील ज्या चालक कर्मचाºयांच्या विनंती बदल्या लातूर, परभणी, सातारा, बुलडाणा व धुळे या विभागात केलेल्या आहेत, त्यांना कार्यमुक्त करू नये, असेही महामंडळाने म्हटले आहे. तसेच सिंधुदुर्ग विभागातून परभणी व अहमदनगर विभागात बदली केलेले चालक आणि कोल्हापूर व अहमदनगर विभागात बदली केलेल्या वाहकांनाही पुढील आदेश देईपर्यंत कार्यमुक्त करू नये, असे महामंडळाने आदेशात म्हटले आहे. पुणे विभागात बदलीवर जाणाºया चालक व वाहकांना तत्काळ कार्यमुक्त करून पुणे विभागातून बदलीवर जाणाºया कर्मचाºयांना सेवा ज्येष्ठतेनुसार कार्यमुक्त करण्यास महामंडळाने सांगितले आहे. रायगड विभागाने स्थगिती उठवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेशही महाव्यवस्थापकांनी दिले आहेत.
औरंगाबादला दिलासा
औरंगाबाद विभागात बदलीवर जाणाºया कर्मचाºयांना सर्व विभागांनी विनासबब सोमवारी, २५ फेब्रुवारीलाच कार्यमुक्त करण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत.