‘टोल’चा घोटाळा बाहेर काढणार
By Admin | Updated: October 9, 2014 00:46 IST2014-10-09T00:42:37+5:302014-10-09T00:46:52+5:30
देवेंद्र फडणवीस : महाराष्ट्रात तीन पायांची शर्यत नको, भाजपला पूर्ण बहुमत द्या

‘टोल’चा घोटाळा बाहेर काढणार
कोल्हापूर : शेतकऱ्यांवर भारनियमनाची टांगती तलवार, व्यापाऱ्यांवर लावलेला ‘लुटो-बाटो टॅक्स’ (एलबीटी), राज्यावर लादलेले तीन हजार कोटींचे कर्ज आणि कायदा-सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा हे चित्र बदलण्यासाठी आता सत्तेसाठी तीन पायांची शर्यत नको. पूर्ण बहुमत असलेले सरकार निवडा. सत्तेत आल्यावर राज्याला अन्यायकारक असलेल्या ‘टोल’चा घोटाळा बाहेर काढू, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज, बुधवारी येथे दिली.
‘कोल्हापूर दक्षिण’चे भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ उचगाव (ता. करवीर) येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रकांतदादा पाटील, बेळगावचे आमदार संजय पाटील, ‘कोल्हापूर उत्तर’चे उमेदवार महेश जाधव, बाबा देसाई उपस्थित होते.
अमल महाडिक म्हणाले, लोकप्रतिनिधींना टोल माफ असूनही पावती फाडून कोल्हापूरकरांच्या जखमेवर मीठ चोळणारे म्हणतात, तुमच्या फायली बाहेर काढतो. अजूनही आठवडा बाकी असून आता तुम्ही फायली बाहेर काढाच. त्याला उत्तर देण्यास समर्थ आहे.
सभेत रामभाऊ चव्हाण, महालिंगम जंगम, राजेंद्र चौगले, शैलजा पाटील, प्रा. जयंत पाटील, भगवान काटे, यशवंतराव शेळके आदींची भाषणे झाली. यावेळी विश्वविजय खानविलकर, राजाराम शिपुगडे, आर. डी. पाटील, मुरलीधर जाधव, दौलतराव संकपाळ, सुनील कदम, दत्तात्रय तोरस्कर, सुरेश जरग आदी उपस्थित होते. राहुल चिक्कोडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
‘बंटी आणि बबली’
‘बंटी’ आणि नागपूरचा ‘बबली’ हे टोप्या फिरवायचे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पुढे चालायचे, असा आरोप फडवणीस यांनी यावेळी केला. ते म्हणाले, ‘वर्षा’वरून रात्रीपासून पहाटेपर्यंत अनेक फायली निकालात निघत होत्या. त्या धनदांडग्यांच्या होत्या
इच्छुक ‘भाजप’मध्ये
राजू माने, माणिक पाटील-चुयेकर, प्रा. बी. जी. मांगले यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह शिवसेनेचे बाबूराव पाटील, महादेव पाटील, शिवाजी मोरे,दयानंद शिंदे, संजय पाटील, अमित कागले, ‘मनसे’चे संतोष जाधव, राहुल कोतेकर आदींनी प्रवेश केला.
प्रा. जयंत पाटील, प्रताप कोंडेकर, चंद्रकांत जाधव यांनी अमल महाडिक यांना पाठिंबा दिला.