आत्मसन्मानाच्या लढाईसाठी सज्ज व्हा - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: September 27, 2014 13:16 IST2014-09-27T09:04:15+5:302014-09-27T13:16:24+5:30
ही निवडणूक म्हणजे आत्मसन्मानाची लढाई असून त्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

आत्मसन्मानाच्या लढाईसाठी सज्ज व्हा - उद्धव ठाकरे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - महाराष्ट्राच्या व हिंदुत्वाच्या मुळावर जे आले त्यांच्यावर मराठीजनांनी जबरदस्त दणका घातला होता, या इतिहासाची आठवण करून देत ही निवडणूक म्हणजे आत्मसन्मानाची लढाई असून त्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला केले आहे. मराठी जनतेच्या मुळावर उठणा-यांची काय हालत होते, हे सांगत त्यांनी भाजपला अप्रत्यक्षरित्या दम दिला आहे.
'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी शिवरायांची व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून देत भावनिक जनतेला साद घातली आहे. महाराष्ट्रात शिवरायांनंतर इतिहास घडविण्याचे कार्य शिवसेनाप्रमुखांनी केले. शिवरायांनी पहिले हिंदवी स्वराज्य स्थापन केले, पण संपूर्ण देशात हिंदुत्वाची भगवी पताका फडकवण्याची जिद्द बाळगली ती शिवसेनाप्रमुखांच्या महाराष्ट्रानेच. महाराष्ट्रात व देशात हिंदुत्व रुजावे यासाठी शिवसेनाप्रमुखांनी असंख्य घाव झेलले. जुन्या औरंगजेबाप्रमाणे नव्या औरंग्यांना धुळीस मिळवले. त्याचीच फळे आज दिल्ली व महाराष्ट्रात डवरलेली दिसत आहेत. जे जे महाराष्ट्रावर मतलबासाठी चाल करून आले ते याच मातीत गाडले गेले, कायमचे नामशेष झाले, असे सांगत त्यांनी राजकीय पक्षांना इशाराच दिला आहे. ज्यांनी महाराष्ट्राचा आत्मसन्मान व स्वाभिमान पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला, त्यांची गत औरंगजेबाच्या थडग्यासारखी झाली. मराठी जनतेचा नि:पात करण्यासाठी आलेले लोकच धुळीस मिळाले. महाराष्ट्राने राष्ट्रहित जपले. राजकीय स्वार्थासाठी हिंदुत्वाची कवचकुंडले कधी वापरली नाहीत असे सांगत जे मर्हाटी माणसांच्या हितावर व महाराष्ट्राच्या इज्जतीवर निखारे ठेवणार्यांना महाराष्ट्राने त्याच मातीत धुळीस मिळवल्याची आठवण उद्धव ठाकरेंनी अग्रलेखातून करून दिली आहे. महाराष्ट्र मर्दांचा आहे आहे असे सांगत हाच मर्दानी बाणा कायम ठेवून, एकजूट होऊन लढाईसाठी सज्ज व्हा असे आवाहन त्यांनी केले आहे.