आव्हाने पेलण्यास सज्ज व्हा
By Admin | Updated: July 20, 2016 00:40 IST2016-07-20T00:40:02+5:302016-07-20T00:40:02+5:30
बुद्धिमत्तेला कष्ट, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाची जोड देणे गरजेचे असते.

आव्हाने पेलण्यास सज्ज व्हा
पुणे : बुद्धिमत्तेला कष्ट, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाची जोड देणे गरजेचे असते. यापुढील प्रगतीचा आलेख चढता ठेवायला हवा. सध्या संशोधनाच्या क्षेत्रात देशात अनेक संधी उपलब्ध आहेत. देशाला वैज्ञानिकांची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे या क्षेत्रात कारकीर्द करण्यासाठी आव्हाने पेलण्यास सज्ज व्हा, असे आवाहन शिक्षणतज्ज्ञ अ. ल. देशमुख यांनी केले.
दहावीत उज्ज्वल यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा डी़ एस़ कुलकर्णी फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर सभागृहात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी देशमुख बोलत होते.
फाउंडेशनचे विश्वस्त श्याम भुर्के, विवेक वेलणकर, अॅड. प्रमोद आडकर, मनीष खाडिलकर आदी मान्यवर उपस्थित होते. महापालिका आणि खासगी शाळांमधील ११० गुणवंतांचा गौरव करण्यात आला.
देशमुख म्हणाले, कष्ट, प्रयत्न आणि अभ्यास हेच यशाचे फलित आहे. दहावीच्या पुढील अभ्यासाची काठिण्यपातळी वाढते आहे. अशा वेळी स्वयंअध्ययन, अभ्यासाची पक्की बैठक आणि समज, तुलनात्मक अभ्यास या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात, असेही ते म्हणाले.
विवेक वेलणकर म्हणाले, बरेचदा परिस्थितीचा बाऊ केला जातो. तसे न करता, परिस्थितीवर मात करून यश मिळवणे आवश्यक असते. यशाच्या मागे न धावता स्वत:मधील क्षमतांचा अत्युच्च विकास साधल्यास यश आपोआप मिळते. यापुढील कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर व्यवहारज्ञान आत्मसात करणे, घोकमपट्टी न करता विषयाचा पाया समजून घेणे, अर्थपूर्ण ज्ञानार्जन अत्यंत गरजेचे आहे. पाया डळमळीत राहिला तर इमारत कशी उभी राहणार, असा सवाल करत, प्रत्येकाने आपली आवड नेमकेपणाने जाणून घेणे आवश्यक आहे. आवडीच्या क्षेत्रात करिअर केल्यास यश मिळते आणि समाधानही. त्यामुळे क्षमतांचे क्षितिज विस्तारणे गरजेचे आहे. श्याम भुर्के यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
>या वेळी अ. ल. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेची माहिती दिली. केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणारी ही योजना पुणे, कोलकाता, बंगळुरु आणि चेन्नई या शहरांमध्ये उपलब्ध आहे. या परीक्षेसाठी लागणारी पात्रता, स्पर्धा परीक्षा, त्यातून मिळणारी संशोधनाची संधी याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.