शिक्षणप्रणालीतून आत्मविश्वास मिळावा

By Admin | Updated: July 30, 2014 01:20 IST2014-07-30T01:20:17+5:302014-07-30T01:20:17+5:30

शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते निवृत्त प्राचार्यांपर्यंत सर्वांच्याच मनात उत्सुकता लागली होती...क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत चालली होती...सभागृहात पाय ठेवायला जागा नाही म्हणून बाहेरदेखील विद्यार्थ्यांची

Get the confidence from education system | शिक्षणप्रणालीतून आत्मविश्वास मिळावा

शिक्षणप्रणालीतून आत्मविश्वास मिळावा

माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम : आंबेडकर महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभ
नागपूर : शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते निवृत्त प्राचार्यांपर्यंत सर्वांच्याच मनात उत्सुकता लागली होती...क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत चालली होती...सभागृहात पाय ठेवायला जागा नाही म्हणून बाहेरदेखील विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती...अखेर ‘ते आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले’....डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ््याच्या सांगता समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे व भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी आपल्या संवादपूर्ण शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. देशातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिभा आहे, परंतु सोबतच गरज आहे ती शिक्षणप्रणालीच्या माध्यमातून त्यांच्यात आत्मविश्वास जागविण्याची. ही जबाबदारी देशातील शिक्षक निश्चितपणे पार पाडतील असा विश्वास कलाम यांनी यावेळी व्यक्त केला.
या सांगता समारंभाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश भूषण गवई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मालती रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत सोहळ््यानंतर डॉ.कलाम यांनी विद्यार्थ्यांशी ‘मी कशासाठी आठवणीत ठेवला जाईल’ या मुद्यावर संवाद साधला. प्रत्येक विद्यार्थ्याने तो खरोखरच कशाकरिता लोकांच्या स्मरणात राहील यासंदर्भात विचार करावा असे ते म्हणाले. भारतातील विद्यार्थ्यांसमोर येणाऱ्या काळात असंख्य संधी आहेत. त्यांच्याकडे दर्जा आहे आणि मेहनत तसेच योग्य नियोजन यातूनच त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख घडवावी, असे आवाहन डॉ.कलाम यांनी केले. विद्यार्थ्यांनी मनात आणले तर देश भ्रष्टाचारमुक्त होऊ शकतो. प्रत्येकाने स्वत:च्या घराजवळ भ्रष्टाचार भटकू द्यायचा नाही असा मंत्र विद्यार्थ्यांना दिला.(प्रतिनिधी)
‘मिसाईल मॅन’ अन् पर्यावरणाचा संबंध काय?
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. कलाम यांनी काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास सांगितले. डॉ. कलाम यांची ओळख ‘मिसाईल मॅन’ म्हणून आहे, पण तुम्ही आता पर्यावरण रक्षणाचे ‘अ‍ॅम्बेसडर’ झाला आहात. ‘मिसाईल’ आणि पर्यावरण रक्षण या दोन परस्परविरोधी गोष्टी आहेत. मग हा बदल का, असा प्रश्न एका विद्यार्थिनीने विचारला. कलाम यांनी याला दिलखुलासपणे दाद दिली व म्हणाले की तंत्रज्ञानाची आवश्यकता ही एका मर्यादेपर्यंतच आहे. परंतु स्वच्छ व प्रदूषणमुक्त पर्यावरण ही अमर्याद गरज आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने झटायलाच हवे व तेच मी करतोय. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना झाडे लावण्याची शपथदेखील घ्यायला लावली. सेंट विन्सेंट पलोटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्रज्ञा शिवणकर हिने ‘कॅम्पस प्लेसमेन्ट’बाबत विचारलेल्या प्रश्नावर डॉ.कलाम यांनी समर्पक उत्तर दिले. विद्यार्थ्यांची मुलाखत घ्यायला जे तज्ञ येतात ते त्यांच्या निकालातील गुणांनी जास्त प्रभावित होत नाही. उलट ते विद्यार्थ्याची क्षमता व आत्मविश्वासाची परीक्षा घेतात. आज स्पर्धेचे युग आहे व त्यासाठी तुम्हालाच तयार व्हावे लागणार, असे ते म्हणाले.
कलामांची मार्गदर्शक कविता
यावेळी डॉ.कलाम यांनी विद्यार्थ्यांना एक उदाहरण सांगितले. कलाम म्हणाले, केरळमधील एका आठवीतील विद्यार्थ्याने मला प्रश्न केला होता की मी शिक्षण तर घेत आहे, परंतु शिक्षणातून मला आत्मविश्वास मिळालेला नाही. एक महत्त्वपूर्ण व्यक्ती बनण्यासाठी मी काय करु, आत्मविश्वास कसा मिळवू? मला आजपर्यंत विचारण्यात आलेल्यांपैकी हा सर्वात अवघड प्रश्न होता. मी त्याला एका कवितेतून उत्तर दिले.
‘आय विल फ्लाय,
आय एम बॉर्न विथपोटेंशिअल,
आय एम बॉर्न विथ गुडनेस
आय एम बॉर्न विथ आयडीयाज् अ‍ॅन्ड ड्रीम्स
आय एम बॉर्न विथ ग्रेटनेस
आय एम बॉर्न विथ कॉन्फिडन्स
आय एम बॉर्न विथ विंग्स
सो, आय एम नॉट मेड फॉर क्रॉलिंग
आय हॅव विंग्स
आय विल फ्लाय, फ्लाय, फ्लाय....

Web Title: Get the confidence from education system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.