‘जेनेटिक प्रॉब्लेम’ची मनसेत लागण
By Admin | Updated: September 8, 2014 02:56 IST2014-09-08T02:56:34+5:302014-09-08T02:56:34+5:30
पक्षाचे विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर, आदित्य शिरोडकर, राम कदम आणि संजय घाडी अशा काही उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीचे मैदान सोडण्याची तयारी केल्याची या पक्षात चर्चा सुरू झाली आहे.

‘जेनेटिक प्रॉब्लेम’ची मनसेत लागण
संदीप प्रधान, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या विधानसभा निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचा फेरविचार सुरू केल्याने या पक्षाचे विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर, आदित्य शिरोडकर, राम कदम आणि संजय घाडी अशा काही उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीचे मैदान सोडण्याची तयारी केल्याची या पक्षात चर्चा सुरू झाली आहे.
राज यांनी आपल्या या विधानाचे खुलासे केले असले तरी ठामपणे निवडणूक लढवणारच असे स्पष्ट केलेले नाही. त्याचा परिणाम म्हणून की काय किंवा लोकसभा निकालानंतर विजयाची खात्री नसल्याने मनसेच्या अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबईत शिवडीतून बाळा नांदगावकर हे निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा आहे. मनसेचे आमदार राम कदम हे मनसेतून भाजपामध्ये जाण्याच्या खटपटीत असल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले. कदम यांच्या कार्यशैलीवरून त्यांचे राज यांच्याशी खटके उडाले. त्यानंतरही त्यांची उमेदवारी पक्की होती. परंतु आता त्यांच्या घाटकोपर मतदारसंघातून दिलीप लांडे यांना उमेदवारी देण्याचे घाटत असल्याचे कळते. लोकसभा निवडणुकीत उमेदवार राहिलेले आदित्य शिरोडकर हे वरळीतून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. मात्र आता तेही फारसे इच्छुक नसल्याची चर्चा आहे. मागील विधानसभा निवडणूक विलेपार्ले मतदारसंघातून लढवलेले शिरीष पारकर हे गेले दीड वर्ष पक्षात दुर्लक्षित आहेत. त्यामुळे तेही पुन्हा निवडणूक लढवण्याची शक्यता नाही.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली गेलेले महेश मांजरेकर व अभिजित पानसे विधानसभा निवडणुकीत पुन्हा नशीब अजमावणार किंवा कसे, याबाबत चित्र धूसर आहे. मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांना अचानक चिपळूणची तर संजय घाडी यांना कणकवलीची एसटी पकडून तेथे उमेदवारीकरिता जाण्याचे फर्मान ‘कृष्णकुंज’कडून काढण्यात आले आहे. मात्र पक्षाकरिता अनुकूल वातावरण नसताना इतक्या ऐनवेळी तेथे जाऊन पराभव पत्करण्यास व खिशाला खार लावून घेण्यास या
दोघांकडून का-कू केले जात आहे. सध्या रत्नागिरीकरिताही ‘कृष्णकुंज’कडून उमेदवाराचा शोध सुरू असल्याने रत्नागिरीशी दुरान्वयाने का होईना संबंध असलेले मनसे नेते धास्तावले आहेत. त्याचवेळी परशुराम उपरकर (सावंतवाडी), वैभव खेडेकर (दापोली) तर अधिक शिरोडकर यांचे पुत्र अॅड. राजेंद्र शिरोडकर (मलबार हिल) यांना वर्षभरापूर्वी या मतदारसंघात काम सुुरू करण्याचा आदेश राज यांनी दिल्याने ते निवडणुकीची कसून तयारी करीत आहेत.