नवकल्पनांनी घडतेय पिढी
By Admin | Updated: May 1, 2017 05:10 IST2017-05-01T05:10:41+5:302017-05-01T05:10:41+5:30
विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळण्यासाठी शाळा प्रयत्नशील असतात. मात्र केवळ अभ्यास एके अभ्यास उपक्रमाने

नवकल्पनांनी घडतेय पिढी
राजानंद मोरे /पुणे
विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळण्यासाठी शाळा प्रयत्नशील असतात. मात्र केवळ अभ्यास एके अभ्यास उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडींकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे चांगले गुण मिळूनही अनेकदा हे विद्यार्थी समाजजीवनात मात्र अपयशी ठरतात. येथील टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल मात्र त्यास अपवाद आहे.
देशाची भावी पिढी घडवायची असेल तर केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगाचे नाही. ज्ञानार्जनाबरोबरच संस्कारक्षम नागरिक म्हणून त्यांची जडणघडण होणे आवश्यक आहे. मात्र फार थोड्या शाळांमध्ये अशाप्रकारचे शिक्षण दिले जाते. केवळ पुस्तकामध्ये दिलेल्या मजकुराची घोकंपट्टी करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील उपजत गुणांना व्यासपीठच मिळत नाही. न्यू इंग्लिश स्कूलने मात्र नवनवीन कल्पनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी कंबर कसली आहे.
शाळेमध्ये यावर्षी ‘अहम भारत’ हा उपक्रम राबविला जात आहे. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनायक पाटणकर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना अधिकाधिक स्वावलंबी बनविण्याचे धडे दिले जातात. ‘मी म्हणजेच भारत’ अशी भावना त्यांच्यात निर्माण केली जात आहे. स्वच्छतेपासून वाहतूक नियमांची माहिती देण्यापर्यंत विविध उपक्रम घेण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी परमवीर चक्र, भारतरत्न मिळालेल्यांची माहिती, त्यावर व्याख्यान, पोस्टर्स प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती मुख्याध्यापक नागेश मोने यांनी दिली.
प्रत्येक भाषा विषयासह इतर विषयांची विद्यार्थ्यांना गोडी लागण्यासाठीही दर आठवडा व महिन्याचा एक दिवस निश्चित करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या गणित विषयाचे मंडळ शाळेत कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची गोडी वाढविण्यासाठी दर पंधरा दिवसांनी समाजसेवा शिबीर घेतले जाते. मागील वर्षी रात्रशाळा भरवून विद्यार्थ्यांना एक वेगळा अनुभव देण्यात आला होता.
प्रत्येक उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो. त्यामध्ये सर्व शिक्षकही उत्स्फुर्तपणे भाग घेतात. विद्यार्थ्यांपर्यंत आगळ््यावेगळ््या पद्धतीने ज्ञान पोहचवून त्यांची बौध्दिक क्षमता वाढविणे आणि त्यांना स्वावलंबी बनविणे, हा त्यामागचा उद्देश आहे.
- नागेश मोने, मुख्याध्यापक, न्यु इंग्लिश स्कूल, पुणे