महानायकाचं फॅशन स्टेटमेंट

By Admin | Updated: October 11, 2014 14:55 IST2014-10-11T14:55:12+5:302014-10-11T14:55:32+5:30

प्रत्येक कार्यक्रमाचे औचित्य पाहूनच पेहराव करणार्‍या महानायकाच्या ग्लोबल लोकप्रियतेत अमिताभ बच्चन यांचा फॅशन सेन्स वाखाणला जातोय.

General's Fashion Statement | महानायकाचं फॅशन स्टेटमेंट

महानायकाचं फॅशन स्टेटमेंट

सर्वसामान्यांच्या मते आज मी कुबेरपुत्र आहे. माझ्या घरातील चारही सदस्य कमावते आहेत. असो, पण, माझं बालपण मध्यमवर्गीयांप्रमाणे गेलं. मां तिच्या माहेरून शीख समाजातील होती, सुसंस्कृत-सुशिक्षित आणि उच्च मध्यमवर्गीय वारसा तिला लाभलेला होता. बाबूजी पेशाने लेखक-कवी आणि प्राध्यापक होते, त्या काळात शिक्षकी पेशा हा आजच्या काळाप्रमाणे हाय-प्रोफाइल नव्हता. धोतर-खादीची कुडती-जाकीट, पायात भारतीय चपला असा पेहराव असे. मां मात्र त्या काळातली असूनही टापटीप राहत असे. आधुनिक तरी भारतीय पेहराव वापरत असे. त्यामुळे माझा फॅशन सेन्स असल्यास.. तो कुठून डेव्हलप झाला असावा ते माझ्या लक्षात येत नाही. महानायक ऊर्फ बिग बी ऊर्फ अमिताभ बच्चन सांगत असतात. युगनायक सदी का महानायक, शहेनशाह अशा अनेक विशेषणांनी युक्त असलेल्या अमिताभ बच्चनचे जे अनेकविध गुणविशेष - व्यक्तिविशेष आहेत, त्यात त्यांचा आवाज, अभिनय, लक्षणीय उंची, सौजन्यशील वागणूक, बहुश्रुतता अशा अनेक खासियतींमध्ये त्यांचा फॅशन सेन्स-ड्रेसिंग सेन्सदेखील वाखाणला जातो. तेही सत्तरीत.. जे आजचे आघाडीचे स्टार्स आहेत, त्यांच्यापेक्षा वयाने अर्धे आहेत, त्यांच्याही ड्रेसिंग सेन्सची इतकी आवर्जून दखल घेतली जात नाही, जितकी महानायकाची घेतली जाते. मला फॅशन सेन्स नाहीये, हे मी विनम्रपणे सांगू इच्छितो. प्रसंगाचे औचित्य साधत मी माझा पेहराव ठरवतो, असे महानायकाने अनेकदा सांगितले. तरी त्याला फॅशन आयकॉन म्हणून ग्लोबली स्थान मिळालेय हेही नाकारून चालणार नाही. 

सामान्यज्ञानाची कसोटी पारखणारा कौन बनेगा करोडपती या गेम शोमध्ये होस्टच्या भूमिकेत कार्यक्रमाला चार चांद लावणार्‍या अमिताभशिवाय या कार्यक्रमाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. सत्तरीतही चपळता, सहज वावर, अगत्यशील वागणूक, सौजन्य अशा अनेक गुणांसह अमिताभचे देखणे व्यक्तिमत्त्व आणि भारतातील अग्रणी फॅशन डिझायनर नरेंद्रकुमार अहमद ऊर्फ नारी यांनी डिझाइन केलेले एलिट सुट्स यात महानायकाचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसते. 
उच्चभ्रू राहणीमान असलेल्या महानायकाकडे जशी समृद्धी येत गेली, त्याने शूटिंगनिमित्त तर कधी स्वत: वैयक्तिक जगभरातून उत्तमोत्तम क्लासिक वॉर्डरोबने स्वत:ला अपडेट ठेवलं. बॉलीवूडचा महानायक ठरलेल्या अमिताभला जगभरातून अनेक मान-सन्मान मिळत गेलेत, त्याचा प्रवास ग्लोबल स्टारच्या दिशने घडत गेला. 'कभी-कभी' सिनेमात टर्टल नेकचे सारे स्वेटर्स अमिताभचे स्वत:चे होते. शाहरूख खानला हे टर्टल नेक स्वेटर्स इतके आवडलेत की, यश चोप्रांच्या 'मोहोब्बते' सिनेमात शाहरूख खानने स्वत: टर्टल नेकचे स्वेटर्स वापरलेत.
भारतीय पेहरावात कॉटन कुडता-पायजमा-शाल या पेहरावाचीदेखील अमिताभने क्रेझ निर्माण केलीये. प्रत्येक कार्यक्रमाचे औचित्य पाहूनच पेहराव करणार्‍या महानायकाच्या ग्लोबल लोकप्रियतेत त्याचा फॅशन सेन्स म्हणूनच वाखाणला जातोय. अनेक देशी-विदेशी मेकची घड्याळे, गॉगल्स, परफ्युम्स यांचाही उत्तम संग्रह महानायकाच्या संग्रहात आहे. अनेक अभिनेत्रींना त्याच्यासोबत प्रणयी दृश्य करणं फारसं अवघड वाटत नसे, कारण सौम्य आणि उच्च प्रतीच्या परफ्युम्सचा आल्दाहदायक दरवळ ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाची एक फारशी चर्चिली न जाणारी आणखी एक खासियत..७१ व्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल फॅशन आयकॉन बनलेल्या महानायकाचे अभीष्टचिंतन करायलाच हवे..
अमिताभ बच्चनची चित्रपट कारकीर्द सत्तरच्या दशकापासून झेपावली. दीवार सिनेमापासून अमिताभची स्वत:ची अशी आयकॉनिक- सिग्नेचर फॅशन स्टाईल डेव्हलप होत गेली. भारतीय मैलाचा दगड ठरलेल्या 'शोले' या ऐतिहासिक सिनेमातही जय अर्थात अमिताभ बच्चनने घातलेले डेनिम ज्ॉकेट्स गेली चाळीस वर्षे तरुणांमध्ये क्रेझ ठरलेत. 'जंजीर'नंतर आलेल्या 'दीवार' सिनेमाने अमिताभला खरी व्यावसायिक यशाची चव दाखवून दिली, त्यात हमाली करणार्‍या विजयने त्याच्या शर्टाला बांधलेली गाठ आजही कूल लूकचे प्रतीक मानले जातात.. त्या सिनेमाची-प्रसंगांची आणि लूकची आठवण सांगताना, बिग बीने म्हटले, खरे तर दीवारचे शूटिंग सुरू झाले आणि मी घातलेल्या शर्टचे बटन तुटले.. माझ्या ऐसपैस उंचीमुळे तुटलेले बटन शूटिंग करताना कॅमेर्‍यांत दिसू लागले. ऐनवेळी शूटिंग करताना बटनाची डागडुजी करणारं नव्हतं, दुसरा शर्टही आणलेला नव्हता. शूटिंग थांबवण्यापेक्षा मला एक थोडी विचित्र कल्पना सुचली, बटन तुटलेल्या जागेवर शर्टाला गाठ मारली तर.. माझी ही कल्पना प्रथम कॅमेर्‍यात पाहण्यात आली, माझे रंगभूषाकार दीपक सावंत यांनीही माझ्या गाठ मारलेल्या लूकला गो अहेडचा सिग्नल दिला. दिग्दर्शक यश चोप्रा यांनीही होकार दिला आणि दीवारचा नायक विजय भारतीय सिनेमाच्या इतिहासात प्रथमच शर्टाला गाठ मारलेला पाहिला.. अँक्शन विथ कॉन्फिडन्स हा पायंडा बहुधा तेव्हापासूनच पडला असावा.
 
- पूजा सामंत

Web Title: General's Fashion Statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.