सामान्य गणित विषयाचा पर्याय रद्द
By Admin | Updated: May 7, 2017 05:03 IST2017-05-07T05:03:22+5:302017-05-07T05:03:22+5:30
शालेय विद्यार्थ्यांना बीजगणित आणि भूमिती हे विषय अवघड वाटतात. दहावीमध्ये या विषयात गुण कमी मिळाल्यास टक्केवारीवर

सामान्य गणित विषयाचा पर्याय रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शालेय विद्यार्थ्यांना बीजगणित आणि भूमिती हे विषय अवघड वाटतात. दहावीमध्ये या विषयात गुण कमी मिळाल्यास टक्केवारीवर परिणाम होतो. अशा विद्यार्थ्यांसाठी २००९-१० या शैक्षणिक वर्षापासून ‘सामान्य गणित’ हा विषय पर्यायी देण्यात आला होता, पण गेल्या पाच वर्षांत विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत असल्याने, यंदा म्हणजे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून सामान्य गणिताचा पर्याय रद्द केला असून, सर्वसमावेशक अभ्यास तयार करण्यात आल्याचे राज्य शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आले.
मार्च २०१३ मध्ये सामान्य गणित विषयाची निवड १ लाख ३७ हजार ७८४ विद्यार्थ्यांनी केली होती. त्यापैकी ८२.५० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मार्च २०१४ मध्ये विद्यार्थीसंख्येत २० हजार ७३७ इतकी घट झाली. या वर्षी परीक्षेला १ लाख १७ हजार ४७ विद्यार्थी बसले होते, तर ९९ हजार १९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मार्च २०१७ मध्ये सामान्य गणित हा विषय निवडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ९९ हजार ५१५ इतकी आहे. दरवर्षी दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही १७ लाख इतकी असते. त्यामध्ये सामान्य गणित विषय निवडणाऱ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे सामान्य गणित विषयाचा पर्याय रद्द करण्यात आला आहे.
दिव्यांगांची काळजी
नवीन अभ्यासक्रम गणित भाग १ आणि गणित भाग २ या दोन पाठ्यपुस्तकांमध्ये बीजगणित, भूमिती आणि सामान्य गणित अशा विषयांचा समावेश आहे. नवीन अभ्यासक्रम हा ज्ञानरचनावादावर आधारित आहे. नवीन गणिताच्या अभ्यासक्रमात विविध कृती आणि नियमांची पडताळणी, सिद्धांतांचे तार्किक स्पष्टीकरण याचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. सामान्य गणिताचा पर्याय रद्द झाला असला, तरी दिव्यांग विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. कारण दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ९वी आणि १०वी मध्ये गणित विषयांऐवजी इयत्ता ७वी अंकगणित (५० गुण) आणि कार्यशिक्षण (५० गुण) विषयाचे पर्याय उपलब्ध असल्याचे बोर्डातर्फे जाहीर करण्यात आले आहे.