कर्जतमध्ये उत्साहात गौरीपूजन

By Admin | Updated: September 10, 2016 02:28 IST2016-09-10T02:28:47+5:302016-09-10T02:28:47+5:30

तालुक्यातील प्रत्येक गावात बहुतांश घरांमध्ये गौरी पूजन केले जाते.

Gauripujan excited in Karjat | कर्जतमध्ये उत्साहात गौरीपूजन

कर्जतमध्ये उत्साहात गौरीपूजन


कर्जत : तालुक्यातील प्रत्येक गावात बहुतांश घरांमध्ये गौरी पूजन केले जाते. यंदा तालुक्यात २६०७ गौरींचे पूजन करण्यात आले. गौरी सणासाठी आलेल्या माहेरवाशिणींनी नववधू, सुवासिनींनी गौरीचे पूजन करून ओवसा घेतला. हा क्षण सुवासिनींसाठी अत्यंत आनंदाचा व महत्वाचा समजला जातो. गैरी-गणपतीमुळे घरा घरांमध्ये प्रसन्न वातावरण आहे.
गुरु वारी पहाटे गौरीची फुले म्हणजेच कचोऱ्याची फुले आणण्यासाठी घरीतील पुरूष मंडळी रानात, डोंगरात जातात तेथून टोपलीत ही साधारण गुलाबी रंगाची फुले सायंकाळच्या सुमारास घरी आणतात. त्यानंतर महिला गौरीच्या पूजेची तयारी रात्रीपासूनच करतात. तेरड्याच्या रोपांसह असलेल्या फुलांनी सजविलेल्या गौरीला साडी नेसवून खुर्चीवर बसविले जाते. त्यानंतर गौरीचा मुखवटा लावून त्या मुखवट्याला दागिन्यांनी सजविले जाते. पुठ्ठयाने बनविलेल्या हातांमध्ये बांगड्या घातल्या जातात व गौरीची फुले व्यवस्थित मांडली जातात. गौरी सणासाठी विशेष करून आपल्या बहिणीला भाऊ सूप घेऊन येतो तसेच चोळी बांगडीसाठी अवर्जून पैसे देतो. ही परंपरा अजूनही खेड्या पाड्यात पहावयास मिळते.
गौरी पूजन झाल्यानंतर साधारण दुपारच्या सुमारास गौरीचा ओवसा सुवासिनी घेतात यावेळी नवीन सुपाचा वापर केला जातो. पिठाने तयार केलेल्या दिव्याने गौरीला ओवाळले जाते. बहुतांश गावांमध्ये अशा प्रकारे गौरी पूजन केले जाते. काही ठिकाणी गौरीची मूर्ती आणून पूजन केले जाते. उभ्या गौरी सुध्दा असतात. यावेळी विविध अभूषणांनी सजलेल्या गैरी ठिकठिकाणी पहावयास मिळाल्या. (वार्ताहर)
नाच-या गौरींचे आकर्षण
रेवदंडा : गणेश उत्सवात गौरीचे आगमन हा सण महिलांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा असतो. या गौरीचे प्रथे प्रमाणे वाजत गाजत आगमन झाले. शुक्रवारी या गौरीचे पूजन झाले. रेवदंडामधील नाच-या गौरी या उभ्या हातापायांच्या असतात त्यामुळे त्यांचे वेगळे आकर्षण आहे. शुक्रवारी गैरीला जरीदार साडीने सजवून विविध आभूषणे, फुलांनी सजवलेल्या गौरी शनिवारी (१० सप्टेंबर) सांयकाळी सातच्या सुमारास पारनाका भागात नाच-या गौरीचा कार्यक्र म पाहण्यासारखा असतो. नाच-या गौरीची सुमारे १३० वर्षाची परंपरा आहे.
सुखी संसारासाठी सौभाग्यवतींनी घातले साकडे
अलिबाग : जिल्ह्यात गुरुवारी घरोघर आलेल्या १४ हजार ६४७ गौरीचे शुक्रवारी विधीवत पूजन के ले.यावेळी नवविवाहीत सौभाग्यवतींंनी आपल्या गौरीच्या ओवशांची सूपे घरातील ज्येष्ठांना वाण देवून गौरीला सुखी संसारासाठी साकडे देखील घातले. शहरी आणि ग्रामिण भागात घरोघरी गौरीचे आगमन झाले असून तिची पूजा, तिच्यासाठी केली जाणारी सजावट, तिचं नटणं, थटणं, पंचपक्वानांचे नैवेद्यानाने उत्साहपूर्ण वातावरणात तिचे स्वागत करण्यात आले. शुक्र वारी गौरीच्या महानैवेद्याचा दिवस असून घराघरात गोडधोडाचे पदार्थ, सोळा भाज्यांचे नैवेद्य दाखिवण्यात आले. यंदा गौराईचे आगमन पुर्वा नक्षत्रावर झाल्याने गौरीचे हौसे(ओवसे) केले जातात. फराळाचे पदार्थ, विड्याची पानं, सुपारी, नारळ सुपात घेऊन नवी नवरी वाण घरोघरी वाण घेऊन जात होत्या. शुक्र वारी घरोघरी गौरींचे पूजन व आरती करण्यात आली. गौरीला आल्यापाल्याची भाजी, भाकरी, दहीभात व अळूच्या वडीचा नैवेद्य दाखवण्यात आला. रात्री महिला एकत्र जमून गौरी गीतांनी रात्र जागवली.

Web Title: Gauripujan excited in Karjat