‘गौरी आली सोन्या मोत्यांच्या पावलांनी’
By Admin | Updated: September 8, 2016 17:28 IST2016-09-08T17:28:43+5:302016-09-08T17:28:43+5:30
गुरुवारी (दि. ८) शहरात घरोघरी महिला सवाष्णींकडून माहेरवाशीण महालक्ष्मीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
‘गौरी आली सोन्या मोत्यांच्या पावलांनी’
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 8 - ‘गौरी आली सोन्या मोत्यांच्या पावलांनी’ असे म्हणत गुरुवारी (दि. ८) शहरात घरोघरी महिला सवाष्णींकडून माहेरवाशीण महालक्ष्मीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गणपती पाठोपाठ माहेरवाशीण गौरींचे अर्थात महालक्ष्मीचे गुरूवारी आगमन झाले.
घरातील सवाष्णींनी गौरीच्या पावलांनी धान्याचे माप ओलांडून आणि औक्षण करून गौरींची स्थापना केली. यावेळी गौरींचा विशेष थाट बघायला मिळाला. ठुशी, छल्ला, मेखला, बाजूबंद (वाकी), नथ, पैसाहार, लक्ष्मीहार, पोहेहार, बोरमाळ, ठुशीचे कानातले, बांगड्या, कंबरपट्टा, मुकुट, पुतळी, मोहनमाळ, तोडे, दुहेरी हार, शाही हार या अलंकारांनी गौरींचे रूप अधिकच खुलून दिसत होते. या गौरींच्या आगमनाने सर्वत्र चैतन्याचे वातावरण बघायला मिळाले.
गुरूवारी गौरींचे आवाहन झाल्यानंतर शुक्रवारी (दि.९) गौरींचे पूजन करण्यात येणार असून, शनिवारी गौरींना भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. महालक्ष्मी हे ऐश्वर्य आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते. गौरी येणार म्हणून महिलावर्गाकडून सजावटीसाठी तसेच आकर्षक आरास बनविण्यासाठी सुमारे एक महिना अगोदरपासूनच लगबग सुरू होती.