फाटक विजयी; डावखरेंना धक्का

By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:08+5:302016-06-07T07:43:08+5:30

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी १५१ मतांनी राष्ट्रवादीचे वसंत डावखरे यांचा पराभव केला.

Gate victorious; Pushing shovel | फाटक विजयी; डावखरेंना धक्का

फाटक विजयी; डावखरेंना धक्का


ठाणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी १५१ मतांनी राष्ट्रवादीचे वसंत डावखरे यांचा पराभव केला. फाटक यांच्या विजयाने ठाण्यातील डावखरे पर्व संपले.
या निवडणुकीत एकूण १०५७ मतदारांनी मतदान केले. त्यामुळे विजयासाठी ५२६ मतांची गरज होती. फाटक यांना ६०१ मते मिळाली, तर डावखरे यांना ४५० मतांवर समाधान मानावे लागले. सहा मते बाद ठरली.
पहिल्या फेरीत फाटक यांना ३११, तर डावखरे यांना १८९ मते मिळाली. याच फेरीत फाटक यांनी १२२ मतांची घेतलेली आघाडी निर्णायक ठरली. दुसऱ्या फेरीत फाटक यांना २९० तर डावखरे यांना २६१ मते मिळाली. या फेरीत फाटक यांना जेमतेम ३० मतांची आघाडी मिळाली असली तरी त्यांच्या मतांची बेरीज ६०१ झाली. ती विजयाकरिता आवश्यक असलेल्या ५२६ मतांपेक्षा अधिक असल्याने फाटक यांना विजयी घोषित करण्यात आले. मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीचा निकाल घोषित होण्यापूर्वीच डावखरे मतमोजणी केंद्राबाहेर पडले. निकालाची अधिकृत घोषणा होताच विजयी उमेदवार फाटक यांनी हा शिवसेना, भाजपा आणि रिपाइं अशा त्रिशक्तीचा विजय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. (प्रतिनिधी)
>मोजणीआधीच जल्लोष
सव्वादहाच्या सुमारास मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात झाली. परंतु, त्याआधी वैध आणि अवैध मतांची वर्गवारी करताना उमेदवारांच्या प्रतिनिधींना फाटक यांच्या विजयाची चिन्हे दिसू लागल्याने लागलीच तसे संदेश व्हॉट्स अ‍ॅपवर टाकले गेले.
शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. शहरभर फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली.
निवडणुकीत जय-पराजय होतच असतो. निवडून आलेल्या रवींद्र फाटक यांना माझ्या शुभेच्छा! - वसंत डावखरे
तब्बल २५ वर्षांनंतर शिवसेनेने डावखरेंचे ‘फाटक’ बंद केले आहे. रवींद्र फाटक यांच्या विजयाने पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यावर भगवा डौलाने फडकला असून, महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचा आणि मेहनतीचा हा विजय आहे.
- एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे जिल्हा

Web Title: Gate victorious; Pushing shovel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.