चार दिवसांत गॅस्ट्रोचे रुग्ण दोनशेपल्ल्याड
By Admin | Updated: July 31, 2016 01:45 IST2016-07-31T01:45:29+5:302016-07-31T01:45:29+5:30
आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाच्या लपंडावामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.

चार दिवसांत गॅस्ट्रोचे रुग्ण दोनशेपल्ल्याड
मुंबई : आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाच्या लपंडावामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या चार दिवसांत गॅस्ट्रोच्या रुग्णांचा आलेख दोनशेच्या वर सरकला आहे. तर मलेरियाच्या रुग्णांनी शंभरी पार केल्याची माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. डेंग्यूच्या रुग्णांनीही गेल्या तीन दिवसांत नव्वदी पार केली आहे.
२५ ते २८ जुलैदरम्यान गॅस्ट्रोचे तब्बल २२० रुग्ण आढळून आले आहेत. दूषित पाणी आणि अन्नाच्या सेवनामुळे गॅस्ट्रोची लागण होते. मलेरियाचे ११४ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूच्या रुग्णांचेही प्रमाण गेल्या चार दिवसांत वाढले आहे. डेंग्यूच्या ९१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. ४४ लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तापाच्या रुग्णातही वाढ झाली आहे. १ हजार २० तापाचे रुग्ण आढळून आले आहेत, तर हेपिटायटिसचे १८ रुग्ण आढळले आहेत. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाने उसंत घेतली होती. गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस आणि मध्येच ऊन असे काहीसे वातावरण आहे. अशा वातावरणात साथींचे आजार बळावण्याचा धोका असतो. दमट वातावरण हे विषाणूंच्या वाढीस पोषक असते. त्याचबरोबर साठलेल्या पाण्यात डासांची पैदास वाढते. त्यामुळे आजारांचा धोका असल्याने मुंबईकरांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)
>डेंग्यू रोखण्यासाठी ही काळजी घ्या...
डास चावू नयेत म्हणून हात-पाय झाकले जातील असे कपडे घाला
रात्री झोपताना डासांपासून बचावासाठी जाळ्या लावा
रुग्णांना डास चावणार नाहीत याची काळजी घ्या
घरातील पाण्याची भांडी आठवड्यातून एकदा तरी रिकामी करा
पाण्याची भांडी, पिंप पूर्ण बंद राहतील याची काळजी घ्या, घट्ट झाकण लावा
आजूबाजूच्या परिसरात टायर, करवंट्या, अडगळीचे सामान राहणार नाही याची काळजी
घ्या.
>लेप्टोस्पायरोसिस टाळण्यासाठी ही काळजी घ्या...
साचलेल्या दूषित पाण्यातून चालणे टाळा
जोखीम गटातील व्यक्तींनी शारीरिक स्वच्छता राखा
कचरा उचलावा, गटारांमध्ये कचरा अडकून गटारे तुंबणार नाहीत याची काळजी घ्यावी
रहिवासी क्षेत्रात पाणी अधिक काळ साठून राहणार नाही याची काळजी घ्या
अन्नपदार्थ स्वच्छ जागी आणि झाकून ठेवावेत
साचलेल्या पाण्यातून चालताना शक्य असल्यास गमबूट वापरावेत.