गॅस सिलेंडर आता वर्षभर
By Admin | Updated: August 28, 2014 03:03 IST2014-08-28T03:03:33+5:302014-08-28T03:03:33+5:30
एका महिन्यात स्वयंपाकाच्या गॅसचे एकच अनुदानित सिलेंडर मिळण्याची अट मागे घेण्यात आली असून आता ग्राहकांना वर्षभर अनुदानित १२ सिलेंडर मिळतील.

गॅस सिलेंडर आता वर्षभर
नवी दिल्ली : एका महिन्यात स्वयंपाकाच्या गॅसचे एकच अनुदानित सिलेंडर मिळण्याची अट मागे घेण्यात आली असून आता ग्राहकांना वर्षभर अनुदानित १२ सिलेंडर मिळतील.
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी एका वर्षात १४.२ किलोचे केवळ ९ अनुदानित सिलेंडर देण्याचा निर्णय रद्द करून ती संख्या १२ केली, असे दूरसंचार व कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी येथे वार्ताहरांशी बोलताना सांगितले.
आधीच्या निर्णयामुळे ग्राहकांची मोठी अडचण व्हायची, असे सरकारच्या लक्षात आले. ग्राहकाला कधी एका महिन्यात एका सिलेंडरची गरज नसायची तर सणावारांच्या दिवसांत जास्त सिलेंडर लागायचे. एखाद्या ग्राहकाने एखाद्या महिन्यात सिलेंडर घेतले नाही, तर राहिलेल्या महिन्यात त्याला ते मिळायचे नाही. आता ही गैरसोय होणार नाही, असे प्रसाद म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती प्रसाद यांनी दिली.
वर्षभर ग्राहकांना अनुदानित १२ सिलेंडर मिळतील. ग्राहकांची होणारी अडचण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. १२ सिलेंडरनंतरही ग्राहकाला गरज असेल तर ते त्याला बाजार भावानुसार (१४.२ किलोसाठी ९२० रुपये) घ्यावे लागेल. राजधानी दिल्लीत हे १४.२ किलोचे सिलेंडर ४१४ रुपयांना मिळेल.
या आधीच्या सरकारने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात वर्षभरात १२ अनुदानित सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला होता; परंतु दर महिन्याला सिलेंडर घ्यावे लागणार होते. ही अट आता काढून टाकण्यात आली आहे.